मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : वैनगंगा नदीपात्रात कोंबड्यांची जलक्रीडा हे शीर्षक वाचून आश्चर्य व कुतूहल वाटेल; परंतु तुम्ही जर पाहिले तर तालुक्यातील माडगी येथे वैनगंगा नदीपात्रात कोंबड्यांच्या जलक्रीडा दररोज सकाळी सुरू आहेत. कोंबड्यांच्या झुंजीदरम्यान त्यांना दम लागू नये, याकरिता त्यांनी ही नवीन शक्कल लढविली आहे. पक्षांच्या व प्राण्यांच्या जिवाला धोका होऊ नये, असे कृत्य करण्याची मनाई असताना राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीपात्रात हे दृश्य मन हेलावून टाकते; परंतु प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वैनगंगा नदीपात्र असून येथे वैनगंगेचे नदीपात्र विस्तीर्ण आहे. पाण्याचा साठाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे माडगी गावाशेजारील दहा ते पंधरा गावांतील कोंबड्यांच्या झुंजी खेळणारे शौकीन दररोज आपल्या कोंबड्यांसह नदीकाठावर येतात. कोंबड्यांना ते नदीपात्रातील पाण्यात फेकतात, त्यानंतर कोंबडा पोहत काठावर येतो किंवा कोंबड्याला एका नावेत बसवून नदीपात्राच्या मध्यभागी सोडण्यात येते. कोंबडा काही वेळ पोहण्याचा प्रयत्न करतो. तो दमला तर त्याला मालक लगेच नावेमध्ये घेतो. अशी ही क्रिया सुमारे तासभर चालते.
त्यामुळे माडगी परिसरातील नदीकाठावर सकाळी मोठी गर्दी दिसून येत आहे. कोंबड्याला नदीपात्रात पोहण्याकरिता सोडण्यात येते. यामुळे कोंबड्याचा व्यायाम होऊन अधिक काळपर्यंत दम न लागता तो भांडू शकतो, असे सांगण्यात येत आहे. कोंबड्याच्या झुंजीदरम्यान प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी दम व ऊर्जेची गरज असते. त्यासाठी पोहण्याचा व्यायाम कोंबड्याला देण्याचा प्रयत्न कोंबडा मालक येथे करीत आहेत.
कोंबड्याच्या झुंजी जोमात
तुमसर तालुक्यात कोंबड्याच्या झुंजी दिवाळी व पुढील जानेवारी महिन्यापर्यंत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू होतात. यात लाखोंचा जुगार खेळला जातो. कोंबड्यावर मोठ्या प्रमाणात पैज लावण्यात येते. कोंबड्याच्या झुंजी खेळण्याकरिता गडचिरोली, वडसा, चंद्रपूर, नागपूर ग्रामीण व भंडारा जिल्ह्यातील शौकीन मोठ्या प्रमाणात येतात. कोंबड्याच्या झुंजीला शासन मान्यता नाही; परंतु हा सर्व प्रकार चोरीने सुरू असतो. यासाठी छुपा आशीर्वाद असतो, असे सांगितले जाते.
प्रशासन अनभिज्ञ
माडगी येथील नदीकाठावरील परिसरातील कोंबडा शौकीन पिशवीत कोंबडे भरून नदीपात्रात कोंबड्यांच्या जलक्रीडा करीत आहेत; परंतु याबाबत प्रशासनाला अजूनही काही माहिती नाही. तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर वैनगंगा नदीपात्र आहे. येणाऱ्या- जाणाऱ्यांना हे दृश्य सहज दिसत असून अनेक नागरिक तिथे उभे राहून ही जलक्रीडा पाहतात. प्रशासन काय दखल घेणार, हे आता महत्त्वाचे आहे.