इंद्रपाल कटकवार
भंडारा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घ्यावे, या मागणीला घेऊन २७ दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत आंदोलनाने आज वेगळेच वळण घेतले. शासन आपल्या दारी कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांचा निघून गेल्याचे कळताच संतप्त झालेल्या या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद चौकात महामार्ग रोखून धरला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची वाहतूक सुरू करण्याकरिता प्रचंड तारांबळ उडाली.
४:१४ वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या या रस्ता रोखो आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आरोग्य सेवेत कायम करावे या मुख्य मागणीला घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर गत २७ दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. सोमवारी मुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. या निमित्ताने मुख्यमंत्री आमच्याशी दोन मिनिटे चर्चा करतील, अशी या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची आशा होती. मात्र ऐन वेळेवर मुख्यमंत्री तिथूनच निघून गेल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क महामार्ग रोखून धरला.
घोषणाबाजी देत शेकडो कर्मचारी रस्त्यावर बसल्याने नागपूर, रामटेक, साकोली व गणेशपुरहून आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जोपर्यंत मुख्यमंत्री येऊन स्वतः आमच्याशी चर्चा करीत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत- महामार्गावर वाहतुकीचा तणाव वाढत असतानाच रस्ता रोको आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह अन्य अधिकारी पोहोचले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणारे दिलीप उटाणे, अचल मेश्राम, हिवराज उके यांच्यासह कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली समजूत व शिष्टाई फळाला आली. नागपूर विमानतळावर आरोग्य कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळांची भेट घालून सकारात्मक तोडगा काढू, असे आश्वासन दिले. आंदोलनकर्त्यांनीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अवघ्या दोन मिनिटातच महामार्ग मोकळा केला. शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाला.
तीन मिनिटांचा झाला घोळ- शासन आपल्या दारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर जिल्हा परिषद चौकातूनच मुख्यमंत्र्यांचा ताफा शहापूर हेलिपॅडकडे रवाना होणार होता. यावेळी मुख्यमंत्री दोन मिनिट आमच्याशी संवाद साधतील, अशी भाबडी आशा आरोग्य कर्मचारी बाळगून होते. मात्र क्षणार्धातच मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथून निघून गेला. आंदोलनस्थळी बसलेल्या कर्मचाऱ्यांना याची पुसटशी कल्पनाही आली नाही. मुख्यमंत्री येत आहेत असेच त्यांना वाटले. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा निघून गेल्याचे कळताच संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. केवळ तीन मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या सगळ्या घडामोडीने जिल्हा प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. तीन मिनिटांपूर्वीच जर आंदोलनकर्ते रस्त्यावर आले असते तर त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांनाच रोखून धरले असते.
गत पंधरा ते विस वर्षांपासून तुटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाजेष्ठतेनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाच्या मंजूर रिक्त पदांवर थेट सेवा समायोजन करण्याची गरज होती. बेमूदत कामबंद आंदोलनाच्या तेराव्या दिवशी मुंडण व काळे कपडे परिधान करून शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेधही केला होता. कोविड काळातील महामारीत आरोग्य विभागात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. २५ ऑक्टोबरपासून या अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचान्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले.