पत्रपरिषदेत आईवडिलांचा आरोप : १० दिवसांपासून मुलगा बेपत्ताभंडारा : साकोली तालुक्यातील किन्ही (मोखे) येथील निपेश रामटेके हा तरूण १० दिवसांपासून बेपत्ता आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्याला गायब करून त्याच्या जीवाचे बरेवाईट केले असावा, असा आरोप निपेशच्या आईवडिलांनी आयोजित पत्रपरिषद केला. साकोली पोलिसांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप करून निपेशचे वडील तुलाराम रामटेके म्हणाले, निपेश (२२) हा १९ मार्चपासून बेपत्ता आहे. त्याचा घरालगत पानठेला आहे. १९ मार्चच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू असताना गावातीलच रामटेके यांच्या घरी तो टीव्ही पाहण्याकरिता गेला होता.दरम्यान गावातीलच शैलेश गणवीर या तरुणाने भ्रमणध्वनी करून निपेशला घरी बोलावले. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याच रात्री ११.३० च्या सुमारास शैलेशचे वडील राधेशाम गणवीर व जगदीश गणवीर हे माझ्या घरी येऊन निपेशची चौकशी केली. त्यामुळे संशय बळावल्याने मुलाची शोधाशोध केली. मात्र त्याचा कुठेही शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी साकोली पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप वडील तुलाराम रामटेके यांनी केला आहे. संशयावरून निपेशचे अपहरण केल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रपरिषदेला माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, रेखा वासनिक, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, लाखनीचे नगरसेवक अनिल निर्वाण, प्रदीप तितीरमारे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
किन्ही येथे संशयावरुन मुलाचे अपहरण
By admin | Published: March 30, 2016 12:53 AM