लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाळीव जनावरे चारण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या एका बालकावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील कुडेगाव येथे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. जखमी बालकाला लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गौरव हरिचंद हेरवार (१६) असे जखमी बालकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी तो घरची पाळीव जनावरे चारण्यासाठी कुडेगाव शेतशिवारात मित्रांसोबत गेला होता. जनावरांना चारावयास सोडून शेतशिवारात बसला होता. त्यावेळी अचानक एका रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने रानडुक्कर पळून गेले. मात्र तोपर्यंत गौरव गंभीररित्या जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारार्थ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित दिली. त्यांनी जखमीची रुग्णालयात जावुन भेट घेतली. गौरवची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गत काही दिवसांपासून तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गत आठवड्यात एका अस्वलाने तीन शेतकऱ्यांन जखमी केले होते.