गर्रा येथील प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेशभंडारा : पत्नीने शरीर सुखाची मागणी फेटाळल्यामुळे स्वत:च्या दोन निष्पाप मुलांची तलावात बुडवून हत्या करणाऱ्या आरोपी पित्याला जन्मठेपेची शिक्षा व ११ हजार रूपयांचा दंड तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.बी. येणूरकर यांनी सुनावली. जितेंद्र सुरजलाल नेवारे (२८) रा.गर्रा, असे जन्मठेप सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकरण असे की, दि.१५ एप्रिल २०१३ रोजी जितेंद्र नेवारे याने पत्नीला शरीरसुखाची मागणी केली. मात्र मागणी फेटाळल्याने आरोपीने तीला धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.१६ एप्रिल २०१३ रोजी आरोपीची पत्नी सकाळी मजूरीच्या कामावर निघून गेली. आयुब (साडे तीन वर्ष) हा मुलगा सकाळी अंगणवाडीत गेला. तर आरूषी (दीड वर्ष) ही मुलगी घरी खेळत होती. आरोपीचा सासरा हा मोहाफूल वेचण्यासाठी गेला होता. आरोपीने मुलगी आरूषीला घेवून अंगणवाडीत गेला. अंगणवाडीतून त्याने आयुषला नेले. दोन्ही मुलांना घेवून बघेडा तलावाजवळ जाताना पाहणारी संगीता राऊत हिने आरोपीला आवाज दिला होता. परंतु त्याने कोणतेही उत्तर न देता निघून गेला होता. आरोपीचा सासरा मोहफूल वेचून घरी परत आला असता त्याला नातवंडे दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली. मात्र फायदा झाला नाही. आरोपी जितेंद्र नेवारे याला गावात शोधले असता तो मिळाला. त्याला विचारपूस केली असता मुलांना मी मारले, असे उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी जितेंद्रला बघेडा पोलीस चौकीत घेवून गेले. परंतु तो पोलीसासमक्ष काहीच बोलला नाही. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी ही माहिती तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांना दिली. त्यांनी रात्री गोबरवाही पोलीस ठाणे गाठले. यावेळी आरोपीची पत्नी ठाण्यात उपस्थित होती. तिने मुलांना जीवानिशी ठार मारून मृतदेह लपवून ठेवले आहे, अशी तक्रार पोलिसात केली. तक्रारीवरून पोलिसांनी जितेंद्र नेवारे याच्याविरूद्ध भादंवि ३०२, २०१ कलमान्वये गुन्हे नोंदविले. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी यांनी केला. त्यानंतर तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपणपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षदारांना तपासण्यात आले. शवविच्छेदन अहवाल तपासण्यात आला. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद व साक्ष पुराव्यांच्या तपासाअंती तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. येणूरकर यांनी आरोपी जितेंद्र नेवारे रा. गर्रा (बघेडा) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाकडून अॅड. राजकुमार वाडीभस्मे यांनी युक्तीवाद केला. (नगर प्रतिनिधी)
मुलांचा खून ; पित्याला जन्मठेप
By admin | Published: January 01, 2015 10:55 PM