इंद्रपाल कटकवार
भंडारा : कोरोनाच्या महामारीने शिक्षणावर बऱ्याच अंशी परिणाम केला आहे. गतवर्षीपासून शाळा बंद, मध्यंतरी सुरू, तर पुन्हा शाळेला ब्रेक लागला. नर्सरी ते इयत्ता चौथीपर्यंतची शाळा सुरू झालीच नाही. त्यानंतरही इयत्ता आठव्या वर्गापर्यंतचे वर्गही बंद होते. परिणामी चिमुकल्यांचा अजूनही सुटीचा मूड कायम असून, त्यांच्यामधील अभ्यासवृत्ती कमी झाल्याचे दिसून येत आहे.
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने संपूर्ण जगातच थैमान घातले आहे. शाळा, महाविद्यालये बंद पडली. लहान मुलांना संसर्गाचा धोका होऊ नये म्हणून नर्सरी, इयत्ता आठवी व त्यानंतर बारावीपर्यंतच्या शाळाही बंद झाल्या. किंबहुना नर्सरी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या शाळा उघडल्याच नाहीत. एरवी उन्हाळ्याची दीड महिन्याची सुटी घालविल्यानंतर बच्चेकंपनी शाळेत रमायची. मात्र, आता चिमुकल्यांचा सुटीचा मूड कायम असून, अभ्यासाचाही विसर पडल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन शिक्षण होत असले तरी ते तेवढे प्रभावी नसल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.
बॉक्स
पालकांनी घरातच घ्यावी शाळा
कोरोना संक्रमण काळात अनेक आई-वडिलांनी घरातच मुलांना शिकविणे बंद केले. काही ठिकाणी शिकवणी वर्गही चोरीछुप्या पद्धतीने सुरू होते. मात्र, कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यानंतर शिकवणी वर्गही बंद झाले. आता पालकांना घरातच शाळा घ्यावी काय असे वाटत आहे. आई किंवा बाबा पाल्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत. पालकांना वेळ आणि इंटरनेटचा खर्चही सोसावा लागत आहे.
कोट बॉक्स
पालकांची अडचण वेगळीच
सध्या नर्सरी ते इयत्ता सातवीपर्यंतचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. दररोज येणारा होमवर्क पाल्यांकडून मी करवून घेते. मात्र, मुलांची मोबाइल पाहण्याची वेळ अधिक होत असल्याचे मला जाणवत आहे. याचा परिणाम चिमुकल्यांच्या डोळ्यांवर जाणवत आहे.
-ममता कुंभारे, पालक
कोट बॉक्स
ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून पाल्यांना शिकवणे सुरू असले तरी त्यांचे बहुतांश लक्ष मोबाइलमधील अन्य बाबींवर राहते. गेम खेळणे, यूट्यूबवरील चित्रकथा बघणे, यातच त्यांचा जास्त वेळ जातो. ऑनलाइन शिक्षण प्रभावी नाही.
-योगेश्वर वाघमारे, पालक
बॉक्स
मुलांना अक्षर ओळख होईना
गत वर्षभरापासून बालके घरातच आहेत. आई-वडीलच त्यांच्यासाठी शिक्षकाचे कार्य करीत आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी यासह अन्य भाषांच्या शिकवणीवर पालक लक्ष देत आहेत. मात्र, मुलांना अक्षर ओळख करून देण्यातही पालकांची कसरत होत असते. मराठी, हिंदी शब्द पालकांकडून लिहून घेणे व त्याचे उच्चारण करून घेण्यातही त्यांची दमछाक होत असल्याचे जाणवते. शाळेतील शिक्षण व घरातील शिक्षण यात फरक असल्याचेही पालक बोलून दाखवितात. डिसिप्लिनशिवाय बालक अभ्यासात वळण घेत नाही, असेही अनेक पालकांचे म्हणणे आहे.
बॉक्स
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
आई मला भूक लागली आहे. जेवण झाल्यानंतर मी अभ्यास करतो. आई थोडा वेळ टीव्ही बघतो. त्यानंतर मी लगेच अभ्यासाला बसेल. घरच्या घरी सायकल चालवतो, थोडा वेळ भाऊ किंवा बहिणीसोबत खेळू का?, असं बोलून विद्यार्थी अभ्यास न करण्यासाठी संधी शोधत असल्याचेही समोर आले आहे. अनेक वेळा पालक नाइलाजास्तव मुलांची ही बाब गृहीत धरून त्यांना परवानगी देतात. मात्र, अशी परवानगी देणेही पालकांच्याच अंगलट येऊ लागले आहे. किंबहुना मुलांना मोबाइलचे अधिकच वेड लागले आहे.