लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा -गोंदिया जिल्ह्यातील उच्च दर्जाचा तांदला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर ओळखच मिळाली नाही. परिणामी पूर्व विदर्भातील भात उत्पादकांना पुरेपूर मोबदला मिळत नाही. हीबाब ओखळून खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारात आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राच्या (ईरी) पाच शास्त्रज्ञांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्याला भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रयत्नातून प्रसिद्ध चिन्नोर तांदळाला लावकच जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रपरिषदेत खासदार सुनील मेंढे आणि ईरीचे संचालक अरविंदकुमार यांनी दिली.खासदार सुनील मेंढे म्हणाले, ईरीच्या पाच शास्त्रज्ञांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शनिवार व रविवारी अभ्यास दौरा केला. प्रमुख धान पिकासह अन्य बाबींची इंत्थभूत माहिती संकलीत करण्यात आली. यात तांत्रिकरित्या कोणते धान उत्कृष्ट आहे, अधिकाअधिक वापरण्यात येणाºया तांदळाच्या वाणाला विकसित कसे करता येईल, बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांना कसे अवगत करता येईल या विषयी या अभ्यास दौऱ्यात माहिती संकलीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.विशेषत: हलका, मध्यम व भारी धानाच्या वाणाबाबत माहिती घेत शेतकऱ्यांना कुठले वाण पिकविण्यास सोयीचे होईल तसेच चिन्नोर तांदळाबाबत त्यांचे मत काय ही बाबही जाणून घेण्यात आली. आगामी खरीप हंगामापासून चिन्नोर तांदळाचे उत्पादन दोनही जिल्ह्यात वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात ईरीची चमू सातत्याने शेतकऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करीत राहणार आहे. यावेळी वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्र (दक्षिण आशियाई विभाग) संचालक अरविंदकुमार यांच्यासह पाच शास्त्रज्ञ व भंडारा जिल्ह्यातील कृषीतज्ज्ञ आणि वरिष्ठ कृषी अधिकारी उपस्थित होते.चिन्नोरची जीआय चाचणीपूर्व विदर्भातील प्रख्यात तांदूळ म्हणजे चिन्नोर. या चिन्नोर तांदळाचे उत्पादन चांगले व्हावे, ब्रॅडिंग दर्जेदार व्हावी याअंतर्गत पहिल्या टप्प्यात चिन्नोर तांदळाची जीआय चाचणी केली जात आहे. प्रारंभी दोन अहवालानंतर त्याचा प्रस्ताव चेन्नईतील कार्यालयाला सादर करण्यात येणार असल्याचेही संचालक अरविंदकुमार यांनी सांगितले. क्षेत्रीय भेटीनंतर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिन्नोर तांदळाची लागवड करण्यास इच्छूक आहेत. येत्या जून महिन्यापासून या तांदळाची लागवड करण्याचा मानस असून जवळपास तीन वर्षात दोनही जिल्ह्यातून २५ हजार हेक्टरमध्ये चिन्नोरचे उत्पादन घेण्याचा मानस आहे. त्यानंतरच त्यावर प्रक्रियेच्या माध्यमातून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चिन्नोर तांदळाची छाप उमटणार असल्याचे अरविंदकुमार म्हणाले.
पूर्व विदर्भातील चिन्नोर तांदूळ जाणार जागतिक बाजारपेठेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:31 PM
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध चिन्नोर तांदळाला लावकच जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रपरिषदेत खासदार सुनील मेंढे आणि ईरीचे संचालक अरविंदकुमार यांनी दिली.
ठळक मुद्देईरीच्या शास्त्रज्ञांकडून पाहणीखासदारांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांशी संवाद