संतोष जाधवर
भंडारा : हजारो मैलांचा प्रवास करीत विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन तलावाच्या जिल्ह्यात झाले असून, भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तलावांत या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. १८ वर्षांपूर्वी अल्पप्रमाणत येणारे कलहंस बदकांचे थवेच्या थवे दाखल झाले आहेत. पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी असून या पक्ष्यांमुळे तलावांचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी युरोप, सैबेरिया, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, किरगीजस्तान लडाखमार्गे स्थलांतरित पक्षी येतात. भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आणि चारा उपलब्ध असल्याने हे पक्षी हिवाळा आली की न चुकता येतात. सध्या कलहंस बदक, लालसरी बदक, कॉमन पोचार्ड, तलवार बदक, शेंडीबदक, गढवाल, गारगेनी, हळदी-कुंकू बदक, चक्रांग, नकटा, चक्रवाक बदकसुद्धा दिसत आहेत. याचबरोबरच अटला बदक, मोठी अडई, लहान अडई, चांदी बदकांचेही प्रमाण वाढले आहे.
पाणकाठ पक्ष्यांमध्ये स्थलांतरित शेकाट्या व स्थानिक पाणपक्षीमध्ये ग्रे हेरॉन, उघड्या चोचीचा करकोचा, ब्लॅक आयबीस, व्हाईट आयबीस, टिटवी,पाणढोकरी, पाणकावळे विविध प्रजातींचे बगळे, ढोकरी, तुतवार, कमळपक्षीही आढळले. वसंत ऋतूत युरोपातील स्थलांतरित पळस मैना दिसत आहे.
कोका, गुढरी, शिवनीबांध, नवेगावबांध, सिरेगाव बांध तलावांवर दुर्मिळ कलहंस शेकडोंच्या थव्याने दिसत आहेत. ग्रीनफ्रेंड्स संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील ३० तलावांवर पक्षी निरीक्षण केले जात आहे. प्रा. अशोक गायधने, धनंजय कापगते, विवेक बावनकुळे, योगेश वंजारी, कोमल परतेकी, श्रुती गाडेगोने, पंकज भिवगडे, रोशन कोडापे यांचा यात सहभाग आहे. याचा अहवाल महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, बीएनएचएस मुंबई, इ -बर्ड, मायग्रँट वॉच बंगलोर या संस्थांना पाठविण्यात आला. जिल्ह्यात येणारे विदेशी पाहुणे पक्षी थापट्या बदक, राजहंस बदक, व्हाइट स्टार्क, रंगीत करकोचा पाणपक्षी यावर्षी आढळले नाहीत.
तलावांचा जिल्हा असल्याने येथे स्थलांतरित पाणपक्ष्यांचे थवे येतात. यावर्षी कलहंस बदक मोठ्या प्रमाणात आले आहेत. प्रशासनाने दखल घेत मोठ्या तलावांत सुरक्षित थांबे, मातीचे छोटे उंचवटे तयार केल्यास काठावरील पाणपक्ष्यांना मासेमार, शिकारी, पर्यटकांपासून सुरक्षितता मिळेल.
-प्रा. अशोक गायधने, कार्यवाह, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी, भंडारा