साकोली : अलीकडे सर्वत्र सिमेंट रस्ते निर्माण केले जात असून या रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हा लावले जात आहे. साकोली तर सिमेंट रस्त्यातून चक्क माती निघण्याचा प्रकार उघडकीस आला. नगरसेविकेने तेथे जावून पाहणी केली तेव्हा रस्त्यातून लाल माती निघाली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नगरसेविकेने तात्काळ काम बंद पडून या प्रकाराची तक्रार मुख्याधिकारी आणि संबंधित कामाच्या अभियंत्याकडे केली. या प्रकाराने साकोलीत एक खळबळ उडाली असून इतर रस्त्याच्या कामावरही आता शंका घेतली जात आहे.
साकोली शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामागे अनिल बावनकर ते निर्वाण यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. येथील नागरिकांनी या सिमेंट रस्त्यातून चक्क लाल, पिवळी मातीच शोधून काढली. नगरसेविका गीता बडोले यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तेथे धाव घेत कामाची पाहणी केली. सत्यता पटल्याने त्यांनी काम बंद पाडले. कामाचा दर्जा सुधारावा याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी व अभियंत्यांना पत्र दिले. तसेच कंत्राटदाराची कानउघाडणी केली. नगरपरिषदेत बांधकामाचा करारनामाच झाला नसल्याची चर्चा उघडकीला येताच एकच खळबळ उडाली. करारच नव्हता तर बांधकाम कसे काय सुरू झाले, अशीही चर्चा रंगली आहे. मुख्याधिकारी सौरव कावळे व अभियंता काय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.