२० किमी पाठलाग : दोन लाखांच्या दारूसह एकाला अटकभंडारा : वेळ मध्यरात्री १२.३० ची... स्थळ भावड ते कोंढा परिसर... अचानक एक व्हॅन येते... दबा धरून बसलेले पोलीस लागलीच रस्त्यावर येतात... समोरून आलेल्या व्हॅनला हात दाखवून थांबविण्याचा इशारा करतात... तोच व्हॅनचा वेग वाढतो... थांबण्याऐवजी पोलिसांना गुंगारा देऊन भरधाव पळतो... आणि सुरू होतो, चोर-पोलीसांचा रात्रीच्या अंधारात खेळ पळापळीचा खेळ... सुमारे २० किमी अंतरपर्यंत पाठलाग करून व्हॅनला पकडण्यात पोलिसांना यश येते. गाडीची तपासणी केली असता, त्यात आढळतो दारूचा साठा... यामुळे आरोपीच्या लागलीच मुस्क्या आवळल्या जातात. हा एखाद्या चित्रपटातील प्रसंग नव्हता. चित्रपटातील प्रसंगाला साजेसा हा प्रसंग वाटत असला तरी, तो चित्रपटातील प्रसंग नसून दारूची तस्करी करणाऱ्याला पकडण्याचा खराखुरा प्रसंग होता. गुरूवारी मध्यरात्रीची ही कारवाई होती. ही बहाद्दर कारवाई केली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी. चित्तथराक प्रसंगाने अंगावर काटा उभा राहतो. या कारवाईत तर पोलिसांनी एक.. दोन नाही तर तब्बल २० किमीचा थरार प्रवास करून दारू तस्काराला दारूच्या साठ्यासह पकडण्यात यश मिळविले.खुशाल बोकडे (२३) रा. मासळ असे दारूसाठ्यासह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली. लाखांदूर मध्यरात्रीला एका व्हॅनमधून लाखो रूपयांच्या दारूसाड्याची तस्करी होत आहे. या माहितीवरून त्यांनी वेळ न दवळता, याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना देऊन भावड ते कोंढा परिसरात तातडीने सापळा रचला. खबऱ्याच्या माहितीनुसार मध्यरात्री अंधाराचा लाभ घेत समोरून भरधाव एक वाहन येताना दिसून आली. या वाहनाला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता कारवाईच्या भितीने सुसाट पळविली. सिल्व्हर रंगाची ओमनी गाडी क्रमांक एमएच ३१ बीबी ९४४१ ही गाडी होती. पोलिसांना बघून पळ काढलेल्या व्हॅनचा पाठलाग स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. दारूची गाडी समोर व पोलीसांची गाडी त्याच्या मागे, असा रात्रीला चित्तथरारक खेळ सुमारे १५ ते २० किमीपर्यंत चालला. अशा धावपळीनंतर पोलिसांनी अखेर व्हॅनला पकडण्यात यश मिळविले.ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक पोलीस निरीक्षक गणेश काळे, पोलीस हवालदार वामन ठाकरे, मंगल कुथे, बंडू नंदनवार, संजय कुंजरकर, पोलीस नाईक दिनेंद्र आंबेडरे, बबन अतकरी, पोलीस शिपाई स्नेहल गजभिये, कौशिक गजभिये, चालक रामटेके यांनी केली. (शहर प्रतिनिधी)
सिनेस्टाईलने पकडली गुन्हे शाखेने दारूची व्हॅन
By admin | Published: April 16, 2017 12:15 AM