लाेकमत न्यूज नेटवर्कवरठी/मोहाडी : पोलिसांच्या सापत्न वागणुकीमुळे वरठी परिसरातील नागरिक कमालीचे संतापले असून अवैद्य धंदे व गुंडांच्या मुजोरीने त्रस्त नागरिकांसह आमदार राजू कारेमोरे मंगळवारी वरठी ठाण्यावर धडकले. यावेळी आमदारांनी ठाणेदारांची चांगलीच कानउघडणी केली. नागरिकांनीही समस्यांचा पाढा वाचला. यामुळे पोलिसांची तारंबळ उडली होती.वरठी ठाणे गुन्हेगारासाठी सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. अवैद्य व्यावसायिकांना अभय मिळत असल्याने गुंडगिरी वाढली आहे. पोलिसांचे नियंत्रण फक्त देवाणघेवाण पुरते असल्याने अवैद्य धंदे फोफावले आहेत. महिला व मुलींना रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. गावठी दारू, गांजा, चरस यासारखे पदार्थ सहज मिळते. पोलिसांच्या आशीर्वादाने वरठी अवैद्य धंदे व कुख्यात गुंडांचे आश्रयस्थान झाले आहे. ठाण्याच्या हद्दीत जवळपास २०० हातभट्टी दारू विक्रेते आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली. घराघरात देशी-विदेशी दारू खुलेआम विकली जाते. सामान्य नागरिकांना खोट्या तक्रारीत अडकवण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांच्या जाचाला कंटाळलेल्या नागरिकांनी थेट पोलीस ठाणे गाठले व समस्यांचा पाढा वाचला. यावेळी आमदार राजू कारेमोरे यांच्यासह उपसरपंच सुमित पाटील, माजी सरपंच संजय मिरासे, दिलीप गजभिये, एकनाथ फेंडर, पंचायत समितीचे माजी उपसभापती कमलेश कनोजे, नेरीचे सरपंच आनंद मलेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, अरविंद येळणे, छोटू मिरासे, सचिन कारेमोरे, योगेश हटवार, विशाल शेंडे, चेतन डांगरे, शैलेश रामटेके, सीमा डोंगरे, विजय पारधी, तारा हेडाऊ, रीता हलमार, प्रतिमा राखडे, बबलू सय्यद, पुरुषोत्तम पात्रे उपस्थित होते. मोहाडीत आमदार झाले आक्रमकमोहाडी ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरून आमदार राजू कारेमोरे चांगलेच आक्रमक झाले असून, वरठी ठाण्यापाठोपाठ मंगळवारी समर्थकांसह मोहाडी ठाण्यात धडक देत पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तत्काळ अवैध धंदे बंद करण्याची तंबी दिली.मोहाडी ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती नागरिकांनी आमदार राजू कारेमोरे यांना देऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावरून आमदारांनी मंगळवारी मोहाडी ठाणे गाठले. त्यानंतर सर्वांची खरडपट्टी काढली. नेहमी शांत दिसणारे आमदार आक्रमक झाले होते. यावेळी ठाणेदारांशी चर्चा करून अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिले. आठ दिवसांत कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याची तंबीही आमदारांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, विजय पारधी, पुरुषोत्तम पात्रे, तारा हेडाऊ, बबलू सय्यद, श्याम कांबळे, सचिन कारेमोरे, सुनील चवळे, सिराज शेख, भूपेंद्र पवनकर, सचिन गायधने आदी उपस्थित होते. आमदारांच्या या आक्रमक पवित्र्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली.
महिलेला ठाण्यात रात्रभर बसवून ठेवले- येथील शास्त्री वाॅर्डातील सरिता घरडे यांच्या घरावर जुन्या भांडणातून हल्ला करण्यात आला. पती विनोद घरडे यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. भांडण सोडवायला आलेल्या इसमालाही जखमी केले. तक्रार करण्यासाठी रविवारी रात्री ११ वाजता सरिता घरडे ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास तब्बल ६ तास तात्कळत बसवून ठेवले. त्यांच्या सोबतीला एकही महिला कर्मचारी नव्हते. पती व शेजारी गंभीर जखमी असताना साधी विचारपूस केली नाही. हल्ला करणाऱ्याच्या तक्रारीवरून चौकशी न करता गुन्हे नोंदविले. जखमींना दवाखान्यात नेणारे चंद्रकांत झळके, सचिन झळके व भांडण सोडवायला गेलेला सूर्यकांत झळके यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले, असा आरोप करण्यात आला. पोलिसांवर कारवाईची मागणी- दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. पोलिसांच्या जुलमी व्यवहाराचे अनेक दाखले देण्यात आले. पोलिसांची सापत्न वागणूक मिळत असल्याने पोलिसांवर कारवाई करून स्थानांतरण करण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे केली. याबाबत पोलीस अधीक्षक, गृहमंत्री, पोलीस आयुक्त, मानवी हक्क आयोग व महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
रात्री २ वाजता पोलीस चौकशी - भांडणात जखमीची दखल घेऊन सदर प्रकरण समजून न घेता मध्यरात्री २ वाजता पोलीस घटनास्थळावर गेले. दरम्यान खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी चुकीचे घटनास्थळ तक्रारीत नोंद केली. जखमी विनोद घरडे व सूर्यकांत झळके यांच्या काळजीत असलेल्या कुटुंबीयांना समज देऊन पोलीस परतले. तक्रार कर्त्याकडून कोणतीही माहिती न घेता जखमी इसमाच्या घरातील महिलांना दमदाटी केल्याची तक्रार आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे करण्यात आली. त्याची आमदार कारेमोरेंनी गंभीर दखल घेतली.
पोलीस प्रशासनावर नागरिकांचा कमालीचा रोष आहे. मी अनेकदा ठाणेदार व वरिष्ठाना कळविले; पण सुधारणा झाली नाही. त्यामुळे ठाण्यात येऊन नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या. सामान्य माणसावर अन्याय सहन केला जाणार नाही. यासाठी रस्त्यावर येऊन मोहाडी, वरठी ठाण्याच्या जुलमी धोरणाची तक्रार गृहमंत्र्यांकडे करणार आहे. -राजू कारेमोरे, आमदार, तुमसर
रेती तस्कारांची दिली यादी- कार्यकर्त्यांनी जवळपास ३० टिप्पर मालक कोणकोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना किती किती रुपये एन्ट्री देतात, याची यादीच टिप्पर क्रमांकासाहित व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावासह उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षकांना सोपविली आहे. या यादीतील नावे व रक्कम पाहून उपस्थितांचे डोके चक्रावल्याशिवाय राहले नाही.
रेतीचा ट्रक पकडला- मोहाडी ठाण्यातून चर्चा करून बाहेर निघत असताना कार्यकर्त्यांना ठाण्यासमोरून रेती भरून जाणारा टिप्पर दिसला. त्यांनी तो टिप्पर थांबविला व लगेच पोलिसांना बोलाविले. टिप्परचालक तेजराम साकुरे याच्या जवळ परवाना नसल्याने टिप्पर जप्त केला.