वरठी व परिसरात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार नित्याचे आहेत. दिवसभरात अनेक वेळा अकारण विद्युत पुरवठा खंडित होतो. देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याने अशा घटना वाढल्या असून, यामुळे विद्युत ग्राहक बेजार झाले आहेत. अचानक वीज चालू-बंद होत असल्याने नकळत याचा फटका ग्राहकांना बसतो. वीज ये-जा मुळे घरातील विद्युत यंत्रात बिघाड निर्माण होत आहे. अनेक व्यवसाय व लघुउद्योग विद्युतवर अवलंबून असल्याने त्यांना फटका बसत आहे. विद्युत खंडित होण्याचे प्रकरण दोन वर्षांपासून सुरू आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा समस्या मांडल्या असून, वितरण विभागाला मात्र फरक पडलेला दिसत नाही. वितरण विभागाच्या हलगर्जी व्यवस्थापनाचा फटका नागरिकांना बसत आहे. अनेक दिवसांपासून जुन्या झालेल्या विद्युत तारांचा मेंटेनन्स करण्यात आलेला नाही. येथील कर्मचारी नियमित कामावर लक्ष देत नसल्याने प्रकरण वाढले आहेत. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना रात्रीची झोपही महाग झाली असून, घरातील विद्युत उपकरणे बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत.
बॉक्स
ग्रामीण भागातही कहर
वरठी केंद्रातून परिसरातील अनेक गावांना विद्युत पुरवठा करण्यात येतो. नियमित देखभाल दुरुस्ती नसल्याने ग्रामीण भागातील विद्युत रात्रभर गुल राहते. अनेक भागात एकदा विद्युत पुरवठा खंडित झाला तर पुन्हा सुरू होत नाही. कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभाराने विद्युत ग्राहक त्रस्त झाले आहेत.
बॉक्स
देखभाल दुरुस्तीचा अभाव
महावितरण विभाग अनेक समस्यांनी ग्रासला आहे. देखभाल दुरुस्तीच्या अभावाने समस्या वाढल्या आहेत. वरठी येथील अनेक भागातील विद्युत खांब रस्त्यावर आहेत. आठवडी बाजारातील मुख्य मार्गावर विद्युत खांब उभे आहेत. वरठी - भंडारा रस्त्यावर विद्युत खांब वाकलेले असून अनेक भागातील खांब जीर्ण झाले आहेत. येथे नियुक्त कर्मचारी दिवसभर खुर्च्या मोडतात; पण देखभाल दुरुस्ती करीत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अनेक खांबांवरील तारा लोंबकळत आहेत. गत अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती होत नसल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.