चुल्हाड (सिहोरा) : नदीच्या काठावर गाव असतानाही बोअरवेलचे पाणी पिण्याची वेळ बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावकऱ्यांवर आली आहे. गावातील नागरिकांना नळ योजनेतून दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असून, यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नळ योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सिहोरा परिसरातून वैनगंगा बारमाही वाहणारी नदी आहे. या नदीच्या काठावर नळ योजनेचे पंपगृह तयार करण्यात आले आहे. नदीपात्रातून थेट उपसा करण्यात आलेले पाणी नागरिकांना पुरवठा केले जात आहे. नदीपात्रातून उपसा करण्यात आलेल्या पाण्याला शुद्धीकरणाची सोय नाही. गावात जलसंकट निवारण्यासाठी नळ योजना असली तरी नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे. गढूळ व दूषित पाणी नदीपात्रातून उपसा होत आहे. चिखलमिश्रित पाण्यावर तहान भागविण्याची वेळ ऐन पावसाळ्यात नागरिकांवर आली आहे. गावात नळ योजनेचे जलशुद्धीकरण नाही. यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. नदीकाठावर गाव असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. गावात नळ योजना असतानासुद्धा नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून आहेत. बोअरवेलचे पाणी शुद्ध व लोहखनिजमिश्रित असल्याचे नागरिक सांगत आहेत. विहिरीचे पाणी आरोग्यासाठी लाभदायक होते; परंतु गावात नळ योजना आल्याने विहिरी बंद करण्यात आल्या आहेत. हीच नळ योजना आता नागरिकांसाठी कामाची नाही. बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सुकली, नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बपेरा गावाच्या हद्दीत सुरू करण्यात आली. योजनेला जलशुद्धीकरण केंद्र आहे; परंतु नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. योजनेची उच्चस्तरीय चौकशी लावण्यात आली नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा विषय वारंवार सभागृहात मांडला; परंतु पाणी पुरवठा योजनेला पुनर्जीवित करण्याच्या मुद्यावर नाक तोंड दाबण्यात आले आहे. योजना भंगारात निघाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असताना जबाबदारी कुणीच स्वीकारली नाही. योजना असताना गढूळ पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. नळ योजनेच्या गावात नागरिकांना बोअरवेलचे पाणी उपयोगात आणावे लागत आहे. देवरी देव, सुकली नकुल, गोंडीटोला, बपेरा, वरपिंडकेपार, ब्राह्मणटोला, महालगाव, सोंड्या गावांत पाणीपुरवठा चिंतेचा विषय झाला आहे. गावातील नळ योजनांना जलशुद्धीकरण मंजूर करण्याची ओरड होत आहे.
बॉक्स
या गावांना आरो प्लांट मंजूर करा
सुकली-नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असून, गावाला दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक अनेक आजारांना बळी पडत आहेत. दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या गावांना आरो प्लांट शासन स्तरावर मंजूर करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेंतर्गत स्वतंत्र पॅकेज मंजूर करण्याची मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, गोंडीटोला ग्रामपंचायतच्या सदस्य शीतल चिंचखेडे, सरपंच ममता राऊत यांनी केली आहे.