स्थानिक दुर्गानगरातील एका वस्तीतील पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाइपलाइन खोदून ठेवली. मात्र, ती अजूनही दुरुस्त करण्यात आलेली नसल्याने येथील नळधारकांना पिण्याच्या व वापराच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. भर उन्हाळ्यातही वस्तीतील लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागले. यासंदर्भात नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांनी पत्राद्वारे तसेच त्या प्रभागातील नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका स्मिता बोरकर यांनाही सूचना दिली आहे. तसेच पाणीपुरवठा प्रशासन विभागाला वारंवार सूचना दिल्या. तरीही महिनाभरापासून तुमसर नगर परिषद नागरिकांना पाणी देऊ शकली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे नगर परिषद, नगरसेवाकांवरील नागरिकांचा रोष वाढत आहे. दलित वस्तीतील नागरिक पाणी कर भरत नाही का? असा सवाल वस्तीतील नागरिकांनी केला आहे. येथील वस्तीत नगर परिषदेचे कर्मचारी येतात. पाहणी करतात. निघून जातात. त्या वस्तीत जागोजागी गड्डे खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. या प्रभागातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.
नागरिकांना महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:24 AM