११ ग्रामपंचायतीचे समर्थन : स्थानिक नागरिक संपात सहभागी
वरठी : गत अकरा दिवसांपासून सनफ्लॅगच्या कामगारांचा संप सुरू आहे. कामगारांच्या मागण्यांकडे सनफ्लॅग व्यवस्थापनाने पाठ फिरवली आहे. जिल्हा प्रशासनाने हात वर केले असून, स्थानिक लोकप्रतिनिधींची मध्यस्थी निष्प्रभावी ठरली आहे. कामगारांच्या संपाला परिसरातील ग्रामपंचायत व नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींनी कामगारांना समर्थनाचे पत्र दिले आहे.
दिवसेंदिवस स्थानिक व परिसरातील नागरिकांचा संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कामगारांच्या संपात स्थानिक नागरिकांची संख्या वाढत आहे. संपाच्या समर्थनार्थ वरठी येथे एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला होता. हा बंद स्वयंस्फूर्तीने पाळण्यात आला. हळूहळू परिसरातील इतर गावांतही बंद ठेवण्यात येणार आहे.
विविध मागण्यांसाठी कामगार संघटना व सनफ्लॅग व्यवस्थापन यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. पण सनफ्लॅग व्यवस्थापन कामगारांच्या मागण्यांबाबत गंभीर नाही. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा न करता त्याची चेष्टा करण्याचे काम व्यवस्थापनाने केले. याबाबत कामगार आयुक्त यांना कळवण्यात आले आहे. त्यांनी कार्यालयीन प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र ती कासव गतीने सुरू असल्याने अनेक महिने निघून गेले, पण कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काही निघाला नाही. यामुळे त्रस्त कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उपसले. १३ मार्चपासून सनफ्लॅग कामगारांनी संप पुकारला आहे. दरम्यान, कंपनी पूर्णतः बंद आहे. ३ हजारांच्या जवळपास कामगार गेटच्या बाहेर आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी आमदार राजू कारेमोरे व दुसऱ्या दिवशी खासदार सुनील मेंढे यांनी कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात चर्चा घडवून आणली. चर्चा निष्प्रभावी ठरली. संपाच्या दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार चरण वाघमारे, माजी खासदार मधुकर कुकडे, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष व तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, बीएसपीचे शरदचंद्र वासनिक, आनंद गजभिये, प्रमोद वासनिक, व माजी खासदार शिशुपाल पटले यांच्यासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी संपाला हजेरी लावून समर्थन दिले आहे. यात बहुजन समाज पक्ष, भारतीय काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, प्रहार संघटना यांचा समावेश आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सनफ्लॅग व्यवस्थापनाला त्यांनी बोलावून संपाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघणार अशी आशा कामगारांनी व्यक्त केली आहे.
बॉक्स
..तर रस्त्यावर उतरू -
कामगारांच्या हक्कासाठी राजकारण होणार नाही. सनफ्लॅग व्यवस्थापन मग्रूर असून, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने मस्तवाल झाले आहे. सनफ्लॅग व्यवस्थापनाच्या भूमिकेवर आमची नजर आहे. आता फक्त समर्थन दिले आहे; पण सनफ्लॅग व्यवस्थापनाची भूमिका अशीच राहिली तर संपात प्रत्यक्ष सहभागी होऊन वेळ पडली तर रस्त्यावर उतरू अशी चेतावणी वरठीच्या सरपंच श्वेता येळणे यांनी दिली. यावेळी नेरीचे सरपंच आनंद मलेवार, बोथलीच्या सरपंच प्रिया हिंगे, बीडचे सरपंच राजेश फुले, पाचगावचे सरपंच संतुलाल गजभिये, एकलरीच्या सरपंच दशमाबाई गजभिये, सोनुली सरपंच दीपाली कुरंजेकर, दाभा सरपंच अस्मिता शहारे यांच्यासह माजी सरपंच संजय मिरासे, उमेश डाकरे, वामन थोटे, उपसरपंच सुमित पाटील, अतुल भोवते, गणेश हिंगे, उपसरपंच रवींद्र वैद्य, विद्या वाघमारे, संगीता मरघडे, नलू साठवणे, हिरालाल लोहबरे, नितीन भुरे, प्रवीण वाघमारे, मनोज सुखाणी, सुनील बडवाईक, रितेश वासनिक, अरविंद येळणे उपस्थित होते.
तोडगा निघण्याची प्रतीक्षा
कामगारांच्या संपाला नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे. Photo Caption
कामगारांना मार्गदर्शन करताना सरपंच श्वेता येळणे.