पालक अगतिक : शिक्षणाच्या बाजारीकरणाचा धंदा, विद्यार्थ्यांकडून वसूलले जाते भरघोस शुल्कभंडारा : शहरातील गल्लीबोळात कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करून लाखोंचा उद्योग सध्या सुरू आहे. नावाजलेल्या क्लासमध्ये पाल्याचा प्रवेश हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला म्हणजे पाल्यांची नाव किनाऱ्यावर लागली, अशीच अनेकांची धारणा आहे. त्यामुळेच आज कॉलेजपेक्षाही क्लासेसची 'किंमत' वाढली असून कॉलेज नाममात्र झाले आहेत.आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे बाजारीकरण झपाट्याने होत आहे. दहावी, बारावीचे निकाल लागले आणि शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशाबरोबरच क्लासेसच्या प्रवेशांची धांदल उडाली. शहरातील क्लासेसनी तर विद्यार्थ्यांच्या टक्केवारीनुसार रेकॉर्डच बनवले आहे. अकरावी, बारावी सायन्स व सीईटीसाठी ४० हजारांपासून एक लाखापर्यंत फी आकारली जात आहे. काही क्लासेस विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी केवळ अकरावी किंवा बारावीच्या वर्गापुरता प्रवेश घेतला तर सीईटीसाठीही प्रवेश बंद राहणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाईलाजाने पाल्ल्यांना अकरावी, बारावीसह सीईटी असे एकत्रित पॅकेज घ्यावे लागत असून फी देखील एकत्रित दिल्याचे अनेकांनी सांगितले. या क्लासेसच्या वाढत्या फॅडमुळे विद्यार्थी मावेनात अन् कॉलेजला विद्यार्थी मिळेना, अशी स्थिती झाली आहे. काही महाविद्यालय व क्लासेसमध्ये साटेलोटे केले जात असून क्लास संचालक सांगतील त्याच कॉलेजात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरला गेला आहे. विशेष म्हणजे अमूक ठिकाणी प्रवेश घेतल्यास हजेरी लावण्यासाठी विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही सांगण्यात येते. यामध्ये पालकांना क्लासची फी व कॉलेजचे डोनेशन असा दुहेरी बोजा सोसावा लागत आहे. खासगी क्लासेसच्या संदर्भात कोणतीही अधिकृत नोंदणी पद्धत नाही. केवळ ज्याला वाटेल तो आपल्या नावाचा बोर्ड लावून व पॉम्पलेट वाटून आपला खासगी क्लास सुरू करीत आहे. एकदा क्लास सुरू झाला की शिक्षण विभागही त्यावर प्रभावी नियंत्रण ठेऊ शकत नसल्यामुळे खासगी क्लासेसचे पेव संपूर्ण फुटले आहे. शाळा-महाविद्यालयात अध्यापन कार्य करणारे शिक्षकसुद्धा कोचिंग क्लास चालवित आहेत. याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)शिक्षण विभागाचे दुर्लक्षभंडारा शहरात शिकवणी वर्गाचा सुळसुळाट झाला आहे. विद्यार्थी शाळेला दांडी मारून शिकवणी वर्गात बसणे पसंत करतात. ११ वी, १२ वीचे विद्यार्थी तर महाविद्यालयात दिसतच नाही. हा प्रकार सर्वांना माहीत आहे. परंतु शिक्षण विभाग अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. नियमानुसार शिक्षकाला शिकवणी घेण्यावर निर्बंध घातले आहे. परंतु काही शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या घरी बोलावून शिकवणी घेत आहे. त्यांना बारावीच्या परीक्षेत प्रात्यक्षिकाचे अधिक गुण देण्याची आमिष दिले जाते. भंडारा शहरात खासगी शिकवणी वर्गांचा सुळसुळाट झाला असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने पुढे येण्याची गरज आहे.
क्लासेस हाऊसफुल्ल.. कॉलेज नावालाच !
By admin | Published: July 09, 2015 12:40 AM