१० लोक २१ के
तुमसर : नगर परिषद तुमसर घनकचरा व्यवस्थापनाच्या कामगारांचे थकीत असलेले चार महिन्यांचे वेतन ऐन सणासुदीच्या काळात माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या निगराणीत वाटप करण्यात आले. सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबात आनंद व्यक्त केला.
गत डिसेंबर २०१९ पासून घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटदाराला पालिकेने देयके दिले नाहीत. परिणामी सफाई कामगारांचे ४ ते ५ महिन्यांचे वेतन थकीत झाले. हातावर आणून पानावर खाणे असे जीवन जगत असणाऱ्या सफाई कामगारांचे पाच महिन्यांचे वेतन थकीत झाल्यामुळे जीवन जगणे असह्य झाले होते. त्यामुळे सफाई कामगारांनी लोकशाही मार्गाने कामबंद आंदोलन केले. परिणामी शहरात सगळीकडेच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले होते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटदाराला देयके देऊन शहर कचरामुक्त व्हावे याकरिता माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली नपवर हल्लाबोल व रस्ता रोको आंदोलन दोनदा करण्यात आले होते.
दरम्यान, प्रभारी मुख्याधिकारी जाधव यांनी तीन दिवसांत कंत्राटदाराचे संपूर्ण देयके काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केवळ सहा लक्ष ७२५२ रुपयांचे देयक युनियन बँक ऑफ इंडिया तुमसर शाखेचा धनादेश दिला होता. मात्र, सदर बँक खात्यात पैसेच नव्हते. त्यामुळे कामगारांची फसवणूक होऊन कामगारांची निराशा झाली. दरम्यान, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी कठोर भूमिका घेत सदर कंत्राटदाराला त्या धनादेशाची रक्कम मिळवून दिली; परंतु कंत्राटदाराचा मोबाइल बंद येत असल्याने परत कामगारांची फसवणूक होत असल्याची जाणीव होताच कारेमोरे यांनी सदर कंत्राटदाराला गाठून कामगारांचे वेतन आजच देण्यास भाग पाडले. अखेर अभिषेक कारेमोरे यांच्या निगराणीत घनकचरा व्यवस्थापनच्या सर्व सफाई कामगारांना चार महिन्यांचे एकत्रित वेतनाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील थोटे, प्रिन्स भरणेकर व बाबू फुलवधवा व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.