प्रकरण दारुच्या रिकाम्या शिशांचे : कर्मचाऱ्यांचे दणाणले धाबे, कनिष्ठांची कानउघाडणी प्रशांत देसाई भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षालगत असलेल्या प्रसाधनगृहात मद्याच्या रिकाम्या शिशा आढळून आल्या. याबाबत ‘लोकमत’मध्ये आज वृत्त प्रकाशित होताच जिल्हा परिषद प्रशासनामध्ये खळबळ उडाली. या वृत्तानंतर जिल्हा परिषद इमारतीत असलेल्या सर्व प्रसाधनगृहांत स्वच्छता ‘मिशन’ राबविण्यात आले. ग्रामीण जनतेची नाळ जुळून असलेल्या भंडारा जिल्हा परिषद येथे दररोज शेकडो नागरिक कामानिमित्त येतात. अनेकांच्या फाईल्स कर्मचाऱ्यांच्या टेबलवर रेंगाळत असतात. गरजुंची कामे वेळेवर न करता त्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रकार येथील कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप आहे. अनेकजण त्यांची इच्छा पूर्ण केल्यानंतरच फाईल पुढे सरकवीत असल्याचा प्रकारही येथे नित्याची बाब झाली आहे. अशाच प्रकारणातून काहींनी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून ओली पार्टी केल्याचे प्रकरण आता समोर आली आहे. मद्यप्राशन केल्यानंतर कुणीतरी दारुच्या रिकाम्या शिशा प्रसाधनगृहाच्या खिडकीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या खिडकीतच अडकल्या होत्या. याबाबत आज ‘लोकमत’ने ‘जि.प. इमारतीत रंगते ओली पार्टी’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. राज्यमंत्री दर्जाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षालगत असलेल्या या प्रसाधनगृहात हा मद्यप्राशनाचा प्रकार घडला. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आज मंगळवारला वृत्त प्रकाशित झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. येथील साफसफाई कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. सोबतच या साफसफाई कर्मचाऱ्यावर देखरेख ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यालाही खडेबोल सुनावण्यात आले. या वृत्तामुळे खळबळून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने इमारतीतील सर्व प्रसाधनगृहाच्या खिडक्यांसह इमारतीची स्वच्छता केली. यात दारुच्या रिकाम्या शिशांसह खर्ऱ्याने थुंकलेल्या पिचकाऱ्या व नागरिकांसह येथील कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या खर्ऱ्याच्या प्लास्टीक काढून फेकण्यात आल्या. मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद एक ना अनेक प्रकाराने प्रसिद्धी झोतात राहत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील आता अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यावर कशा पद्धतीने वचक ठेवतील याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्हा परिषदेत राबविले ‘स्वच्छता मिशन’
By admin | Published: January 04, 2017 12:43 AM