लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या मोठा बाजार परिसरात आठवड्यातून दोनदा भरत असलेला आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजीव्यवसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. उघड्यावर फेकलेला सडलेला भाजीपाला, ओट्यांची दुरवस्था, अतिक्रमण हीच खरी ओळख या बाजाराची बनली आहे. प्रशासन मात्र प्रस्तावाच्या मंजुरीवर लक्ष केंद्रीत करून आहे.जिल्ह्याचीे लोकसंख्या १४ लाखांच्या वर पोहोचली आहे. यात भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे. दर आठवड्यातून दोन वेळा आठवडी बाजार भरतो. रविवारी मोठा तर बुधवारी मिनी बाजार भरतो. रविवारपेक्षा बुधवारी भाजी विक्रेत्यांची संख्या कमी असते. या बाजारारत टाकळी, पांढराबोडी, गणेशपूर, कारधा, भिलेवाडा, पलाडी, करचखेडा, सुरेवाडा, माडगी, सातोना, मोहदुरा, खोकरला, टेकपार, भोजापूर आदी गावातील लहान-मोठे भाजीविक्रेते येत असतात.आठवडी बाजार ओसरल्यानंतर सडलेला भाजीपाला साहीत्य तिथेच फेकून दिला जातो. कर देतोय तर सुविधा का मिळत नाही? असा थेट सवाल या भाजीविक्रेत्यांचा आहे. दुसरीकडे एका भाजीविक्रेत्याकडून बाजाराच्या दिवशी एका भाजीविक्रेत्याकडून पावती फाडली जाते. आठवडी बाजाराचा कंत्राट कुणालाही असो मात्र लिलावातून मिळणारी रक्कम थेथ पालिका प्रशासनालाच मिळते. सडक्या भाजीपाल्यांवर यथेच्छ ताव मारणारे मोकाट जनावरे, अतिक्रमण निर्मूलनानंतर वाईट स्थितीत आलेले बाजारओटे, २४ तास येणारी दुर्गंधी, पाण्याची टंचाई, नाल्यांचे सदोष बांधकाम, साचलेला कचरा या बाजाराच्या प्रमुख समस्या आहेत.लोकसंख्येच्या मानाने शहराच्या विविध ठिकाणीही बाजार भरतो. यात महात्मा गांधी चौक, बीटीबी मार्केट (थोक सब्जी मंडी बाजार), मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक मार्ग, खात रोड मार्ग आदी ठिकाणचा समावेश आहे. परंतु मोठा बाजार परिसरात रविवारी व बुधवारी भरणाऱ्या बाजाराची शान आजही कमी झालेली नाही. मात्र सुविधांअभावी या बाजाराला अजुनही उठाव आलेला नाही. हजारो नागरिक येथे बाजारासाठी येत असले तरी विकासाअभावी त्यांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला सर्वस्वी जबाबदार नगर पालिक प्रशासन आहे, असेही म्हणता येणार नाही. याला नागरिकांसह भाजीविक्रेत्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारीही तेवढीच महत्वाची आहे.
आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 9:54 PM
शहराच्या मोठा बाजार परिसरात आठवड्यातून दोनदा भरत असलेला आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजीव्यवसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. उघड्यावर फेकलेला सडलेला भाजीपाला, ओट्यांची दुरवस्था, अतिक्रमण हीच खरी ओळख या बाजाराची बनली आहे. प्रशासन मात्र प्रस्तावाच्या मंजुरीवर लक्ष केंद्रीत करून आहे.
ठळक मुद्देनिधीची वानवा : लक्षावधींचा महसूल मिळूनही उपेक्षा, भाजीविक्रेत्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात