गोंदिया : पंचायत समितीस्तरावर मागील ७-८ वर्षांपासून अडकून पडलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामांतील अडचण आता दूर झाली आहे. सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्यांची कामे आता लवकरच होणार आहेत.
तालुक्यात पंचायत समिती स्तरावर कित्येक ग्रामपंचायतअंतर्गत पाणंद रस्त्यांचे सुमारे ६७५ काम फक्त गिट्टी टाकून अर्धवट पडून आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास होत आहे. यासंदर्भातील तक्रारी आ. विनोद अग्रवाल यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्याचीच दखल घेत आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामांतील अडचणी जाणून घेतल्या. यात मुरूम खोदण्यासाठी प्रतिब्रास रॉयल्टी घेण्याच्या अटीमुळे ही कामे अडकून पडली होती. यावर त्यांनी प्रस्ताव सादर झाल्यास अगोदर मुरूम खोदकामाची परवानगी देण्याची व काम झाल्यानंतर रॉयल्टी जारी करण्याची मागणी केली. यामुळे आता या कामांतील अडचण दूर झाली आहे, तर ग्रामपंचायतींनी पाणंद रस्त्यांकरिता मुरमाचे उत्खनन करण्यासाठी तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. यात १४० रस्त्यांच्या खडीकरण व मुरुमीकरणासाठी १७ कोटी रुपये असा एकूण २५ कोटींचा खर्च येणार आहे. लवकरच या कामांना गती दिली जाणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.