लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : मोहाडी येथील नर्मदा पब्लिक स्कूल व कारधा येथील हायटेक पब्लिक स्कूल शिक्षणाधिकाऱ्यांनी अनाधिकृत ठरवलेली आहे. त्यामुळे त्या दोन्ही शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात अन्यथा दंडाची कारवाई करू, असे पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद भंडारा आणि संबंधित शाळेच्या संस्थाप्रमुख, तसेच मुख्याध्यापकांना पत्र पाठवून कळविले आहे
सौजन्य शिक्षण संस्था कान्हळगाव या संस्थेची नोंदणी सहायक धर्मादाय आयुक्त, भंडारा यांनी २७ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे संस्थेद्वारा संचालित नर्मदा पब्लिक स्कूल, मोहाडी व हायटेक पब्लिक स्कूल, कारधा या दोन्ही शाळा बंद करण्यात याव्यात. शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्यात यावे, असे पत्र १२ जुलै २०२४ ला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संस्थाप्रमुख व मुख्याध्यापकांना दिले होते.
संस्थाप्रमुख व संबंधित पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांनी त्या पत्राला जुमानले नाही. याउलट विविध कारणे समोर करून शाळा बंद केली नाही. सौजन्य शिक्षण संस्था कान्हळगाव संचालित नर्मदा पब्लिक स्कूल, मोहाडी व हायटेक पब्लिक स्कूल, कारधा या शाळा तीन महिने होऊनही बंद करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अहित होत आहे. संस्थेची नोंदणी सहायक आयुक्त, यांनी रद्द केल्यामुळे संस्थेद्वारा संचालित शाळा अनधिकृत ठरत असल्याचे दिसून आले आहे.
तर तरतुदीनुसार कार्यवाही विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा ठपका शिक्षणाधिकारी यांनी ठेवला आहे. शाळा तत्काळ बंद कराव्यात. अन्यथा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ नुसार रुपये १ लाखपर्यंत दंडाची रक्कम व त्यानंतरही शाळा अनधिकृतरीत्या सुरू राहिल्यास रुपये १० हजार प्रतिदिवशी दंड करण्याची तरतूद अधिनियमात करण्यात आलेली आहे. अन्यथा तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के यांनी संबंधित संस्था व त्याची प्रत दोन्ही पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांना ८ ऑक्टोबर रोजी दिली आहे. आता या पत्राची दखल संबंधित संस्थाप्रमुख व मुख्याध्यापक किती गांभीवनि घेतात याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहे.