काही वर्षाअगोदर नव्याने कोका वन्यजीव अभयारण्याची स्थापना करण्यात आली. हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या अभयारण्याला लागून असलेल्या गावातील लोकांचा रोजगार बुडाला आहे. अभयारण्य निर्मिती वेळी स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणार असे आश्वासन वनविभागाकडून गावकरी लोकांना देण्यात आले होते. मात्र गाव विकासाच्या नावाखाली अनेक निधी शासनाने खर्च केला असला तरी अभयारण्यामध्ये लागून असलेल्या गावातील बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही. गावातील काही तरुणांना या अभयारण्यामध्ये गाईड या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मात्र ही नियुक्ती कंत्राटी स्वरूपात असून त्यांना पर्यटक आले तरच त्यांना मानधन, रोजगार मिळतो. गत वर्षीपासून कोरोनाने पर्यटन व्यवसाय बंद असल्याने त्या गाईडला रोजगार मिळणे दुरापास्त झाले आहे. अभयारण्यामध्ये इतर कोणतीच कामे निघत नसल्याने त्यांना इथे रोजगारही उपलब्ध होत नाही. वनातील मोहफुल गोळा करणे तसेच तेंदूपत्ता संकलन करणे व वन विभागामार्फत लाकडांची कटाई केली जात होती. यामुळे स्थानिक गावकऱ्यांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होत होता.
वन्य प्राणी संरक्षणासाठी शासनाचा लाखोंवर खर्च
वन्य प्राणी संरक्षणासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देते. वन कर्मचाऱ्यांवरही खर्च करीत असून पाहिजे त्या प्रमाणात फायदा होताना दिसत नाही. कदाचित या अभयारण्याला तारांचे कुंपण घालण्यात आले तर येथील कर्मचाऱ्यांचा फौजफाटा काही प्रमाणात कमी केला जाऊन शासनाचा पैसा वाचवता येऊ शकतो अशी प्रतिक्रिया जंगलव्याप्त नागरिक करीत आहेत. येथील संबंधित कर्मचारी व अधिकारी पर्यटन विकासासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करीत नसून गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याची ओरड होत आहे. मागील पाच वर्षांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून येत आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून दुधाळ जनावरांचे वाटप या विभागामार्फत काहींना देण्यात आले.