भंडारा : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या दाट धुक्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेले पीक पुन्हा निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे हरभरा, गहू व कांदा पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात धुके वाढले आहेत. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढत असताना तीन दिवसांपासून सर्वदूर धुके दाटत आहे. गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकरी त्रस्त झाले होते. त्यात पुन्हा आता धुक्याची भर पडली आहे. तीन दिवसांपासून धुके पडत असून, सकाळी तर धुक्याची जाड चादरच निर्माण झालेली दिसते. गहू व कांदा पिकांसाठी धुके धोकादायक समजले जात असून, परिणामी रब्बी पिकांना फटका बसत आहे.
खरीप हंगामात निसर्गाच्या वक्रदृष्टीने धानपिकाचे उत्पादन अत्यल्प झाले. आता रब्बी पिकांवर आस असताना हरभरा, गहू व कांदा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक कसे वाचवावे, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
- उमराव मस्के, शेतकरी खुटसावरी.
हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी क्विनालफाॅस २५ टक्के, ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के, एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरानट्रनिलीप्रोल १८.५ टक्के, एससी २.५ मिलि प्रती दहा लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी.
-हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, भंडारा