प्रलंबित मागण्यांची पूर्तता : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांनी दिली साथभंडारा : मागील आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या मागण्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने आतापर्यंत आश्वासनाचे गाजर दाखविले. यामुळे संतप्त जिल्हा परिषद शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांना सुमारे दीड तास घेराव घातला. यानंतर जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या समस्या तातडीने निकाली काढल्या. जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या निकाली काढाव्यात यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या आठही संघटनांनी एकत्र येऊन शिक्षक कृती समितीची निर्मिती केली. या समितीच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांमार्फत जिल्हा परिषद प्रशासनामार्फत लढत सुरु आहे. मागील आठ महिन्यापूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक प्रमुख समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याचे केवळ आश्वासन देऊन वेळ मारून घेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला. यामुळे प्रलंबित समस्या सुटत नसल्याने आज सोमवारला शिक्षक कृती समितीच्या शेकडो शिक्षकांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कक्षात ठिय्या मांडला. यावेळी सीईओंनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता शिक्षकांनी समस्यांची त्वरीत सोडवणूक करा, अन्यथा घेराव मागे घेणार नाही अशी भूमिका मांडली. दरम्यान शिक्षकांनी सीईओंच्या कक्षात ठिय्या मांडल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेता अरविंद भालाधरे, संदीप ताले, के.के. पंचबुद्धे, प्रेमदास वनवे यांनी सीईओंचे कक्ष गाठले. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी सामोपचाराने चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांना बोलावून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तातडीने करण्याचे सूचविले. मात्र शिक्षकांनी ‘अभी नही तो कभी नही’ ही भूमिका घेत समस्या आजच सोडवावी अशी भूमिका घेतली. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन नमले. सीईओ अहिरे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी घेराव मागे घेतला. सुमारे दीड तास सीईओंच्या कक्षात हे आंदोलन चालले. या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक कृती समितीचे मुबारक सय्यद, रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, वसंत साठवणे, विकास गायधने, केशव बुरडे, राजन सव्वालाखे, सुधीर वाघमारे, मुकेश मेश्राम, संदीप वहिले, सुधाकर ब्राम्हणकर, हरिकिशन अंबादे, रमेश पाथरीकर, गिरीधारी भोयर, मुकुंद ठवकर, महेश गावंडे, प्रमोद घमे, रमेश काटेखाये, अशोक ठाकरे, कोमल चव्हाण, विजय चाचेरे, रवी उगलमुगले, यशपाल बगमारे, बि.पी. भुते, अरुण बघेले आदींनी केले. (शहर प्रतिनिधी)या मागण्यांचा समावेश पदावनत उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे आदेश उद्या (मंगळवारला) व उर्वरीत मुख्याध्यापकांची कार्यशाळा १९ एप्रिलला घेण्यात येईल. माध्यमिक शिक्षक व उपमुख्याध्यापक, विषय शिक्षकांचे आदेश निर्गमीत करण्यात येईल, केंद्रप्रमुख पदाचा कारभार ज्या पदवीधर शिक्षकांकडे आहे त्यांनी आपला पदभार तात्काळ गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपवावे, कारधाचे केंद्रप्रमुख प्रदीप काटेखाये यांचे स्थानांतरण आदेश काढण्यात आले. यासह अन्य मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
शिक्षक संघटनेचा सीईओंना घेराव
By admin | Published: April 18, 2017 12:33 AM