भंडारा : पावसाळ्यात अभयारण्यातील पायवाटा पुसल्या जाण्याच्या शक्यतेबरोबर गवताचे व झुडपे वाढण्याचे प्रमाण अधिक असते. पर्यटकांची वाहने रस्त्यात व चिखलात रूतण्याची शक्यता राहत असल्याने १ जुलैपासून राज्यातील सर्व अभायारण्य बंद होणार असून कोका अभयारण्य सुद्धा बंद होणार आहे. मात्र, नागझिरा व कोका अभयारण्यातील दोन ते तीन मार्ग काही दिवस पावसाच्या परिस्थितीनुसार खुले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यातील एकमेव कोका वन्यजीव अभयारण्यात यावर्षी पर्यटकांची गर्दी पहावयास मिळाली. मात्र पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडण्याची शक्यता आहे. हिवाळा व उन्हाळ्यात जंगलात वाहन घेवून अथवा पायी फिरणे सोयीचे असते. मात्र, जोरदार पाऊस पडल्यास जंगलात फिरणे गैरसोयीचे ठरते. झाडी व गवत उंच वाढल्याने पायाजवळचेही लक्षात येत नाही. तसेच जंगलातील रस्ते पाण्याने वाहून जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर रस्त्यांवर झाडे आडवे पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वन्यप्राणी सुद्धा दिसेनासे होतात. पाणी जिकडे तिकडे उपलब्ध होत असल्याने वन्यप्राण्यांचे दर्शन होणे दुर्लभ ठरते. रस्ते कमकुवत ठरून गाड्या जंगलातील रस्त्यात फसण्याची शक्यता अधिक असते. जाड झाड्यांमुळे पर्यटक जंगलात वाट चुकण्याची दाट शक्यता असते. पावसामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वनविभागामार्फत दरवर्षी जून अखेरीस किंवा १ जुलैपासून अभयारण्यातील पर्यटन थाबविण्यात येते. यावर्षी अद्याप पावसाने जोर धरलेला नसल्याने १ जुलैपासून अभयारण्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोका अभयारण्य सुद्धा त्याला अपवाद नाही. त्यामुळे कोका वन्यजीव अभयारण्य प्रशासनाने १६ ते ३0 जूनपर्यत पर्यटकांच्या आॅनलाईन बुकिंग बंद केल्या आहेत. या दरम्यान आॅन द स्पॉट बुकिंग सुरू राहतील. मात्र जोरदार पर्यन्यवृष्टी झाल्यास स्पॉट बुकिंग सुद्धा बंद केल्या जातील. पावसाच्या पार्श्वभूमिवर व्याघ्र प्रकल्पात सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात वन्यजिव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांनी बैठक घेतली. यामध्ये अभयारण्यातील प्रवेश बंदीची तारीख निश्चित झाल्याची माहिती आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. (नगर प्रतिनिधी)पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने १६ ते ३0 जून पर्यंत कोका अभयारण्यातील आॅनलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे. यादरम्यान स्पॉट बुकिंग पर्यटकांसाठी सुरू राहील. मात्र, जोरदार पाऊस झाल्यास ती बुकिंग सुद्धा बंद करण्यात येईल. १ जुलैपासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहील. पुन्हा सप्टेंबरपासून अभयारण्य पर्यटकांसाठी सुरू केले जाईल. प्रकल्पाच्या व पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.-ए. जी. शेडगे, वनपरिक्षेत्राधिकारी, वन्यजीव अभयारण्य कोका.
कोका अभयारण्य १ जुलैपासून होणार बंद
By admin | Published: June 18, 2016 12:25 AM