भंडारा : आपला संसार सुखी, समाधानी, समृद्धी, प्रगती, शांतीचा व्हावा आणि कुटुंबातील सर्वांना आरोग्य, संतती, संपत्तीचा लाभ व्हावा, सर्व व्याधी व अरिष्ट नाहीसे व्हावे यासाठी स्त्रिया अनेक व्रतवैकल्य, अनुष्ठाने, दान, धार्मिक उपासना मनोभावे करतात. सुवासिनींसाठी अतिशय महत्वाचे, मांगल्याचे, प्रभावी मानले जाणारे कोकिळा व्रताचा योग यंदा आला आहे. १८ वर्षांनंतर येणारा हा व्रत ३० जुलैपासून सुरू होऊन महिनाभर केला जातो. ज्यावर्षी अधिक आषाढ येतो त्यावर्षी निज आषाढ पौर्णिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत हे व्रत केले जाते. यंदा गुरूवार चतुर्दशी म्हणजे ३० जुलै रोजी या व्रताची सुरुवात होऊन शनिवार, नारळी पौर्णिमेला म्हणजे १९ आॅगस्ट रोजी समापन होणार आहे. कोकिळेच्या रुपात असलेल्या पार्वतीचे या व्रतात पूजन केले जाते. वशिष्ठ ऋषींनी शत्रुघ्न पत्नी कीर्तीमाला हिला ही कथा सांगितली होती. काही महिला एक महिनाभर, काही तीन दिवस तर काही महिला एक दिवसाचे व्रत करतात.सुवासिनींनी पूर्ण श्रद्धेने व्रत काळात या व्रताची कथा ऐकून किंवा ओवीबद्ध महात्म्य ऐकून उद्यापनाला तीन किंवा सात सुवासिनींना ओटी प्रदान करावी. स्नान केल्यानंतर यथाशक्ती चांदीचे, सोन्याचे अथवा कागदावर आंब्याच्या झाडावर बसलेली कोकिळा काढावी व षोड्शोपचारपणे पूजा करावी. दिवसभर हवीशा अन्नात साळीचे तांदूळ, डाळ, मूग, वाटाणे, दुधभात, दही-तूप, सुरण, पांढरा मुळा, नारळ, फणस, केळ सेवन करावे तर रात्री उपवास सोडून शुद्धान्न घ्यावे, असे कळविण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने सर्वत्र दुष्काळी वातावरण असल्याने नागरिक हैराण आहेत. (प्रतिनिधी)
मनोकामना पूर्ण करणारे कोकिळा व्रत
By admin | Published: July 31, 2015 1:09 AM