शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट : तिबार पेरणीने शेतकरी हवालदीलसाकोली : उन्हाळी धानाच्या रोवणीसाठी साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुबार तिबार धानाची पेरणी केली. मात्र कडाक्याच्या थंडीमुळे धानाची पऱ्हे करपली. काही शेतामध्ये पऱ्हेच उगवलीच नाही. हा काही रोग असावा यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून पाहणी केली असता थंडीमुळे पऱ्हे उगवले नसल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा निसर्गाच्या प्रकोपामुळे नापिकीसारख्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.निसर्गाच्या हलरीपणाचा फटका खरीप हंगामावर होणार असे भाकीत हंगामाच्या सुरवातीला करण्यात आले होते. ते भाकित खरेही ठरले. खरीप हंगामाचे अंत्यला उत्पन्न आले. त्यात भावही कमीच मिळाला. या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांनी कसाबसा करून पुन्हा उन्हाळी धानाच्या लागवडीला लागले. या खरीप हंगामाची भरपाई उन्हाळी धानपीकातून काढण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीस पंचेविस दिवसांपुर्वी धानाची पऱ्हे टाकली. पहिल्यांदा टाकलेली पऱ्हे आले. त्यानंतर ती करपली. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणाचा दोष असावा, असे वाटले. त्यामुळे साकोली तालुक्यातील बोंडे येथील दहा बारा शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना करपलेली पऱ्हे पाहण्यासाठी बोलावले. यावेळी अधिकाऱ्यांनी पऱ्ह्याची पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांनी तीबार पेरणी केली व त्यांचे झालेले नुकसान त्याचे काय, हा प्रश्न निरूत्तरीय राहिला. (तालुका प्रतिनिधी)
थंडीमुळे धानाचे पऱ्हे करपले
By admin | Published: January 01, 2015 10:56 PM