लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अधिकारी येतात आणि जातात. परंतु ते कायम कुणाच्या स्मरणात राहत नाहीत. एखादा अधिकारी आपल्या कार्यशैलीने कर्मचाऱ्यांमध्ये स्थान निर्माण करतो आणि सामान्यांचे प्रश्न स्वत:चे समजून पोटतिडकीने निवारण करतो, अशा अधिकाऱ्याला निरोप देताना त्यांच्या अधिनस्थ सारे अधिकारी आणि कर्मचारी भावविभोर होतात, ती त्यांच्या यशाची आणि लोकप्रियतेची पावती ठरते, असाच काहीसा प्रकार गुरूवारला मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निरोप देताना पाहायला मिळाला.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना आज छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, स्मिता पाटील, अर्चना मोरे, शिल्पा सोनाले यांच्यासह तहसिलदार आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नवे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांच्या हस्ते सुहास दिवसे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.दिवसे यांनी वर्षभराच्या कार्यकाळात शाश्वत विकासाच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करून अंमलबजावणी सुरू केली. आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी मनरेगा प्लस ही संकल्पना मांडली. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणी व प्रशिक्षणावर भर देऊन सक्षम प्रशासन ही संकल्पना रूजू केली. शिक्षणाला नवी ऊर्जा मिळावी व विद्यार्थ्यांवर बालवयापासून संस्कार रूजविण्या-साठी त्यांनी २१ कौशल्य व १० मुल्य असलेला ‘सक्षम’ हा उपक्रम राबविला. याउपक्रमांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षीत करून जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले, अशा शब्दात त्यांच्या कार्याचे आज कौतुक झाले.
निरोप समारंभात भारावले जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:47 PM