लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना येण्याचे आवाहन करण्यात आले असून, १० मार्चपर्यंत कामावर येणाऱ्या काेणत्याही कर्मचाऱ्याच्या विराेधात कारवाई करण्यात येणार नाही, अशी भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. यामुळे आता किती कर्मचारी कामावर येतात हे महत्त्वाचे आहे.एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचारी संपात आहेत. भंडारा विभागातील सहा आगारांतील १४४३ कर्मचाऱ्यांपैकी १२६५ कर्मचारी संपात सहभागी झाले हाेते. त्यापैकी २०० ते २५० कर्मचारी महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर परतले. मात्र, अद्यापही एक हजार कर्मचारी संपावर आहेत. यामुळे एसटी सेवा विस्कळीत झाली असून, अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काही बसफेऱ्या सुरू आहेत.तीन महिन्यांपासून संप सुरू असला तरी याबाबत अद्याप काेणताच निर्णय झाला नाही. उलट राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात समाविष्ट करणे अव्यवहार्य आहे असे गत आठवड्यात म्हटले हाेते. त्यामुळे अनेक कर्मचारी कामावर येण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र, आपल्यावर कारवाई तर हाेणार नाही ना, अशी भीती आहे. दरम्यान, महामंडळाने कामावर परतू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत कामावर परतणाऱ्या काेणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट कळविण्यात आले आहे. बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रकांकडे अपील दाखल करायचे आहे. त्यात जाे निर्णय हाेईल त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. आता किती कर्मचारी कामावर येणार, हे लवकरच कळणार आहे.
बसस्थानकावर वाढू लागली गर्दी- भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या भंडारा, गाेंदिया, साकाेली, तुमसर, तिराेडा, पवनी या आगारांतून माेजक्याच कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटीच्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिवसाकाठी ५०० फेऱ्या हाेत आहेत. बस असल्याने आता प्रवासी बसस्थानकावर गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. भंडारा बसस्थानकावरून नागपूरसाठी प्रत्येक तासाला बस असून, प्रत्येक बस प्रवाशांनी खचाखच भरून जाते. मात्र, ग्रामीण भागातील बससेवा ठप्प असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही.