नाना पटोले यांचे आवाहन : लाखांदूर येथे हागणदारीमुक्त उत्सव सोहळा, ४२ गावांतील सरपंचांचा सत्कारलाखांदुर : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली तर गावच सोडा, संपूर्ण देशच विकासाची वाट धरेल. राजकारण व पक्ष वाद गाव विकासाला अडचण ठरते, तेव्हा सर्वजण एकत्र येऊन गाव विकासाचा आराखडा तयार करा, आम्ही त्या शासन दरबारी मंजूर करवून घेऊ त्यानंतर सर्व गाव विकासाच्या योजना आपोआप आपल्या गावात लोटांगण घालतील, यातून संपूर्ण जिल्हा विकासाच्या दिशेने धावायला लागेल असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती लाखांदुरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त उत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यपालन अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, माधुरी हुकरे, शुद्धमता नंदागवळी, नेपाल रंगारी, सभापती मंगला बगमारे, उपसभापती वासुदेव तोंडरे, नगरसेवक विनोद ठाकरे, पं.स.सदस्य कुंडलिक पेलने, शिवाजी देशकर, गुलाब कापसे, राजेंद्र ठाकरे, नेहा बगमारे, कांता मेश्राम, सभापती अर्चना वैद्य, गटविकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर, गटविकास अधिकारी गिरीश धायगुडे, पी. टी. निर्वाण, ए. जी. हेडवू, बालविकास अधिकारी वैतागे, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आमदार बाळा काशिवार म्हणाले, हागणदारीमुक्त गाव हे केवळ कागदावर किंवा शासनाकडून पुरस्कार घेऊन होत नाही, अधिकारी किंवा पदाधिकारी हागणदारीमुक्त गाव करू शकत नाही तर गावातील प्रत्येक व्यकी, प्रत्येक कुटुंबप्रमुखाने मनात संकल्प करून स्वत:चे गाव स्वच्छ व निरोगी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिल्हाधिकारी म्हणाले, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी केवळ शासनाच्या निधीतून शौचालय बांधणे एवढेच महत्त्वाचे नाही तर शौचालयाचा पुरेपूर वापर झाला पाहिजे, गावात स्वच्छता दिसली पाहिजे. याप्रसंगी ४२ गावातील सरपंच व सचिवांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला राहुल सपाटे यांनी स्वच्छ भारत अभियानावर आधारीत भजन कार्यक्रम पार पाडला, त्यानंतर असर फाऊंडेशन भंडारा च्या कलापथकाने स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले, संचालन सुरेश लंजे यांनी, तर प्रास्ताविक डि.एम.देवरे यांनी करून, आभार मेळे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
एकत्र येऊन गाव विकासाचा आराखडा तयार करा!
By admin | Published: January 24, 2017 12:31 AM