भंडारा : गत एप्रिल महिन्यात मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना सलग दुसऱ्या दिवशीही मोठा दिलासा मिळाला. मंगळवारनंतर बुधवारीही कोरोनाने बळी गेला नाही. दरम्यान, ९० व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ८१ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत १०५४ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात तर दररोज सरासरी १५ ते २० जणांचा मृत्यू होत होता. संपूर्ण वर्षभरातील मृत्यूच्या निम्मे मृत्यू एकट्या एप्रिल महिन्यात झाले होते. त्यानंतरही मे महिन्यात दररोज कुणाचा ना कुणाचा कोरोनाने बळी जात होता. जून महिना उजाडला आणि दिलासा मिळाला. जून महिन्याच्या पहिल्या दिवशी कोरोनाने कुणाचा मृत्यू झाला नाही, तर दुसऱ्या दिवशीही म्हणजे २ जूनलाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
बुधवारी १५१९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात १९, मोहाडी २, तुमसर ६, साकोली ६२, लाखांदूर एका रुग्णाचा समावेश आहे, तर पवनी व लाखनी तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आता ५८ हजार ९४५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, त्यापैकी ५६ हजार ८९६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ९९५ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
बाॅक्स
साकोलीत रुग्णसंख्या वाढू लागली
जिल्ह्यात सर्वत्र रुग्णांची संख्या कमी होत असताना साकोली तालुक्यात मात्र रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी ६२ रुग्णांची नोंद झाली, तर मंगळवारी ६४ रुग्ण आढळून आले होते. सोमवारी सुद्धा ६३ रुग्ण वाढले होते. साकोली तालुक्यात आता कोरोनाबाधितांची संख्या ७३९८ झाली आहे.