पालांदूर : निसर्गाच्या अनेक हुलकावण्या स्वीकारीत खरीप हंगाम हातातोंडाशी आलेला आहे. ९० ते १२० दिवसांच्या धानाचा कापणी हंगामाचा श्रीगणेशा झालेला आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत गोंडेगाव येथील अमित बोरकर यांच्या शेतातील धान कापणी सुरू झालेली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यास चूलबंद खोऱ्यात धान कापणी धडाक्यात सुरू होऊ शकते.
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून धान घेतला जातो. जिल्ह्याला धानाचे कोठार संबोधले जाते. प्रत्येक शेतकरी धान उत्पादित करतो. मात्र, दिवसेंदिवस निसर्ग धोका देत असल्याने धानाचा हंगाम संकटात येत आहे. निसर्गाच्या अनेक हुलकावण्या स्वीकारीत शेती करणे जुगार खेळण्यासारखे झाले आहे. शासनाने पुरविलेल्या पीककर्जात हंगाम कसणे अशक्य झाले आहे. महागाईने कहर केला असून त्या तुलनेत धानाचे भाव अत्यल्प आहेत. १९४० रुपयांचा दर आधारभूत केंद्राअंतर्गत चालू हंगामासाठी जाहीर झालेला आहे. वास्तविक २५०० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळणे अत्यावश्यक असतानासुद्धा लोकप्रतिनिधी मात्र भाव देण्यात कमी पडलेले आहेत. एका हंगामाचे उत्पन्न वर्षभर कुटुंबाचे पोषण करू शकत नाही. शासनाला याची जाणीव असूनही उपाययोजना करीत नसल्याने शेतकरी अठराविश्वे दारिद्र्यात खितपत जगत आहेत. परंतु नाईलाज असल्याने वडिलोपार्जित शेती आहे म्हणून कसत असल्याचा अनुभव तरुण पिढीतून पुढे येतो आहे.
हलक्या धानाचा शेतकरी पुरता हतबल
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहत जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या पावसाच्या अंदाजाने हलक्या धानाचा शेतकरी पुरता हतबल आहे. मात्र, तुडतुडा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी धान कापणीकडे वळलेला आहे. १२० दिवसांच्या पुढील धानाला तुडतुड्याची लागण झालेली आहे. खर्चाची पर्वा न करता पीक वाचविण्यासाठी शेतकरी कीडनाशक फवारणी करीत आहेत. हलक्या ते मध्यम धानाला तुडतुड्यापासून दूर ठेवण्याकरिता कापणी बरी, असे म्हणत लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात धान कापणी सुरू झालेली आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा
शासनाच्या नियमानुसार १ ऑक्टोबरपासून धान खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. मात्र, वेळकाढू धोरणात अडकलेले आधार केंद्र १ ऑक्टोबरपासून सुरू होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. लाखनी तालुक्यातील बऱ्याच कोठारात अजूनही गत रब्बी हंगामाचे धान पडून असल्याने खरिपाची खरेदी समस्येत येऊ शकते. ऑनलाईन खरेदी करण्याच्या अनुषंगाने धान खरेदी केंद्रावर नोंदणीकरिता शेतकऱ्यांच्या लांब रांगा अनुभवायला मिळत आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी तत्परता बाळगत वेळेत धान खरेदी केंद्र सुरू करणे शेतकरी हितार्थ ठरणार आहे.