भंडारा : आपलं लग्न संस्मरणीय व्हावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. किंबहुना बरेचजण आपले लग्न स्मरणीय करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत असतात. त्यासाठी काही धनाढ्य लोक हवेत लग्न करतात, कुणी पाण्याच्या खाली लग्न करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील एका युवकाने आपल्या लग्नाच्यादिवशी लग्नमंडपात जाण्याआधी वृक्षारोपण करून आपलं लग्न संस्मरणीय करण्याचा स्तुत्य प्रयत्न करून आपल्या कृतीतून सर्वांना पर्यावरण संरक्षणाच्या संदेश दिला.
गुरुदेव यशवंतराव ठाकरे (रा. इटान) असे या नवरदेवाचे नाव आहे. एकीकडे शासन "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणेंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी विशेष भर घालत असूनही अलीकडे अनेकांना पर्यावरण संरक्षणाचा विसर पडत चालला आहे. मात्र, याला काही अपवादही आहेत. इटान येथील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परिचालक म्हणून कार्यरत असलेल्या गुरुदेव यशवंतराव ठाकरे यांचा शीतल सुरेश अलोने (रा. सावंगी, ता. देसाईगंज) हिच्यासोबत ६ फेब्रुवारी रोजी लग्न सोहळा पार पडला. गुरूदेवने स्वतःच्या लग्न समारंभदिनी लग्नमंडपात जाण्याआधी वृक्षारोपण करून आपलं लग्न संस्मरणीय करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. या युवकाने प्रत्यक्ष कृतीतून सर्वांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला . सर्वांनी आदर्श घेण्यासारखे कृत्य करणाऱ्या या नवरदेवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावाची परंपरा जोपासली
यापूर्वी येथील उपसरपंच गिरीश भागडकार यांनीसुद्धा २०१८ मध्ये आपल्या लग्नाआधी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला होता. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून संगणक परिचालक गुरूदेवनेही आपल्या लग्नाआधी वृक्षारोपण करून लग्न मंडपात प्रस्थान केले.