रेशन दुकानदारांत चर्चेला उधाण
लाखांदूर : सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली अंतर्गत दरमहा स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य उचल करण्यापूर्वी शासनाला भरावयाच्या चालान रकमेअंतर्गत कमिशन घोटाळा झाल्याची खमंग चर्चा आहे. सदर घोटाळा बोगस चालान भरणा केल्याचे दाखवून त्यामध्ये लाखो रुपयांचा कमिशन घोटाळा तालुका अन्न पुरवठा विभागांतर्गत करण्यात आल्याची खळबळजनक व संतापपूर्ण चर्चा रेशन दुकानदारांत केली जात आहे.
लाखांदूर तालुक्यात एकूण ९६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामध्ये १२ दुकाने सेवा सहकारी संस्था तर ११ दुकाने बचतगट अंतर्गत असल्याची माहिती आहे. या दुकानांतर्गत नियमित कार्डधारक जनतेला शासन योजनेनुसार अन्नधान्याचा दरमहा पुरवठा केला जात आहे. सदर पुरवठा होण्यासाठी दरमहा रेशन दुकानदार आवश्यक धान्याची उचल करण्यासाठी रेशन कार्डवरील घटकनिहाय धान्य मंजुरी अंतर्गत शासनाला विक्री कमिशन कपात करून चालानचा भरणा करीत असल्याचीदेखील माहिती आहे. सदर चालान भरताना रेशन दुकानदार शासनाकडून प्रतिक़्विंटल ७० ते ८० रुपये कमिशनप्रमाणे रक्कम कपात करून उर्वरित रक्कम शासनाला जमा करीत असल्याची माहिती आहे.
कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन होऊन बँकेतदेखील शासननिर्देशाचे पालनात आर्थिक देवाणघेवाण करताना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. सदर त्रास टाळण्यासाठी तालुक्यातील बहुतांश धान्य दुकानदारांनी येथील अन्नपुरवठा विभाग अंतर्गतच ऑनलाईन चालानचा भरणा केल्याची चर्चा आहे. सदर भरणा येथील अन्न पुरवठा विभागातील एका संगणक परिचालकामार्फत केला जात होता, अशीदेखील चर्चा आहे. मात्र सदरचा भरणा करताना संबंधित परिचालकाने शासनाकडून दिल्या जाणाऱ्या कमिशनपेक्षा अधिक कमिशन कपात करून बोगस चालानद्वारे धान्य मंजुरी चालविल्याची आरोपात्मक चर्चा आहे.
सदर गैरप्रकार तालुक्यातील काही रेशन दुकानदारांच्या लक्षात येताच सदर प्रकरण दडपण्याहेतू आवश्यक तजविजदेखील केली जात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गत पाच वर्षांपूर्वीदेखील तालुक्यातील अन्न पुरवठा विभागांतर्गत सव्वा दोनशे क़्विंटल धान्याचा अपहार प्रकरण उजेडात आले होते. मात्र काही वर्षे लोटत नाहीत तोच पुन्हा येथील अन्न पुरवठा विभागांतर्गत रेशन दुकानदारांच्या कमिशनमधून लाखोंचा घोटाळा झाल्याच्या चर्चेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन बोगस चालानद्वारे कमिशनमधून अत्याधिक रक्कम कपात करून लाखोंचा घोटाळा करणाऱ्याविरोधात कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.
कोट बॉक्स
अन्न पुरवठा विभागांतर्गत रेशन दुकानदारांचे चालान भरणा करताना कोणताही गैरप्रकार झाल्याचे माहीत नाही. चौकशी करून माहिती घ्यावी लागेल.
-डहारे, तालुका अन्न पुरवठा निरीक्षक