लाखांदूर : रेशन दुकानदारांना शासनाकडून दिले जाणाऱ्या कमिशनचा बोगस चलनाद्वारे घोटाळा केल्याची चर्चा होताच तालुका अन्न पुरवठा विभागाचे पितळ उघडे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि या घोटाळ्या संबंधाने रेशन दुकानदारांच्या नवनव्या आरोपात्मक चर्चांची भर पडत असून, शासन कमिशनदेखील हडपल्याची बोंब केली जात आहे.
माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यात ९६ रेशन दुकाने असून, या दुकानांतर्गत नियमित कार्डधारक लाभार्थी जनतेला धान्याचा पुरवठा केला जात आहे. सदर धान्य पुरवठा होण्यासाठी रेशन दुकानदार नियमित शासनाला प्रतिक़्विंटल कमिशन कपात करुन उर्वरित रक्कम चलनाद्वारे भरणा करीत असल्याची माहिती आहे.
सदर चलन ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरायचे असून, सदर प्रक्रियेंतर्गत चलन भरणाऱ्या दुकानदारांना जवळपास १५० रुपये कमिशन उपलब्ध होत असल्याची माहिती आहे. मात्र, गतवर्षी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने बँकेत चलन भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्याच्या हेतूने तालुक्यातील रेशन दुकानदारांनी अन्न पुरवठा विभागातील संगणक परिचालकांमार्फत चलन भरणा करण्याचे काम चालवल्याची चर्चा आहे. तथापि सदर चलनाचा ऑनलाईन भरणा करण्याच्या नावाखाली संबंधित परिचालकांकडून अतिरिक्त पैशांची वसुली करण्यात आल्याची आरोपात्मक चर्चा आहे.
दरम्यान, चलन भरणा झाल्याचा पुरावा म्हणून अनेक दुकानदारांना विना स्वाक्षरीची चलने भरणा केल्याची पावती देण्यात आल्याचे बोलले जात आहे. यासबंधी प्रक्रियेत बोगस चलन देताना शासन नियमानुसार मिळणारे कमिशन अतिरिक्त रक्कम कपात करुन शासन कमिशन देखील हडपण्यात आल्याची बोंब आहे. दरम्यान, हा गैरप्रकार वर्षभरापूर्वीपासून तालुक्यात सुरू असल्याने या गैर प्रकारांतर्गत लाखोंचा घोटाळा झाल्याची बोंब केली जात आहे.
एकूणच ऑनलाईन चलन भरणा करण्यासाठी येणारा खर्च म्हणून केली जाणारी नियमबाह्य वसुली, शासनाकडून उपलब्ध होणारे ऑनलाईन चलन कमिशन व रेशन दुकानदारांच्या कमिशनमधील अतिरिक्त कपात आदी सर्व गैरप्रकारांनी शासन कमिशन देखील हडपल्याची बोंब असून अन्न पुरवठा विभागाचे पितळ उघडे पडणार असेच सर्वत्र बोलले जात आहे.
बॉक्स
कमिशन घोटाळ्यातील संगणक परिचालकाची हकालपट्टी
बोगस चलनाद्वारे रेशन दुकानदारांची आर्थिक लुबाडणूक केल्याचा आरोप होताच येथील अन्न पुरवठा विभागातील अनधिकृत संगणक परिचालकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. या परिचालकाने गत काही महिन्यात रेशन दुकानदारांच्या कमिशन कपातीत प्रचंड घोळ करुन लाखोंचा गैरव्यवहार केल्याची आरोपात्मक चर्चा रंगली होती. या संबंधाने दैनिक ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच परिचालकावर ही कारवाई करण्यात आली.