लाखांदूर : गत पाच दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे लाखांदुर तालुक्यातील बहुतांश गावांमधील जवळपास हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपीक व बागायती शेतीचे नुकसान झाले. आ. डॉ. परिणय फुके यांनी गुरुवारी ६ मे रोजी क्षतिग्रस्त भागाचा दौरा करून धानपिकाची पाहणी केली असून, नुकसानीचा मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.
पिंपळगाव/कोहळी कन्हाळगाव, चिचगाव, मडेघाट, पुयार व लाखांदूर या भागात पावसासह गारपीटदेखील पडल्याने धानपिकासह, बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे क्षतिग्रस्त भागात १३१५ हे. क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यात ४२५ हे. क्षेत्रात ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाली आहे. डॉ. फुके यांनी क्षतिग्रस्त भागात दौरा करत धान पिकाची पाहणी केली आहे. यावेळी तहसीलदार अखिलभारत मेश्राम, कृषी विस्तार अधिकारी बालाजी शेन्नेवाड, अतुल देशमुख, नितीन बोरकर, विनोद ठाकरे, ॲड. वसंत एंचीलवार, नरेश खरकाटे, गोपीचंद भेंडारकर, प्रकाश राऊत, भारत मेहंदळे, रिजवान पठाण, भाऊराव दिवठे आदी उपस्थित होते.