भंडारा : शहरालगतच्या गणेशपूर, पिंडकेपार शिवारात गत शनिवारपासून ढाण्या वाघाचा संचार आहे. रविवारी पाणी पुरवठा योजनेजवळ माकडांचे काॅलींग पहायला मिळाले; मात्र वन विभागाने लावलेल्या तीनही कॅमेरात या वाघाची इमेज आली नाही. दरम्यान, वैनगंगा नदीच्या सुरक्षा भिंत परिसरात सोमवारी पुन्हा पगमार्क आढळून आले. वन विभागासह गणेशपूर आणि पिंडकेपारचे नागरिक या परिसरात गस्त घालीत असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरालगतच्या गणेशपूर शिवारातील साठवणे यांच्या शेतात शनिवारी सकाळी मोठ्या वाघाच्या पायाचे ठसे आढळले होते. गणेशपूर शिवार ते पिंडकेपारपर्यंत साधारणत: एक ते दीड किलोमीटर पगमार्क दिसून आले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. भंडारा वन विभागासह गणेशपूर आणि पिंडकेपार येथील नागरिकांनी या परिसरात गस्त सुरू केली. वन विभागाने तीन ट्रॅप कॅमेरे रविवारी लावले; मात्र अद्याप कुणाला या वाघाचे दर्शन झाले नाही. रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पिंडकेपार गावाजवळ एका रानडुकराला वाघाने मारल्याचे सांगण्यात आले. काही नागरिकांना चमकत असलेले वाघाचे डोळे दिसून आले; परंतु या परिसरात ना मृतावस्थेतील रानडुक्कर आढळला ना पगमार्क.
दरम्यान, रविवारी दुपारी गणेशपूर पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीजवळ माकडांचे काॅलींग एकायला आले. एखादा हिंस्त्र प्राणी परिसरात आला की माकड उंच झाडावर चढून बसतात आणि विशिष्ट आवाज काढतात, त्याला काॅलींग म्हणतात. ही काॅलींग आल्यानंतर परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले होते; परंतु तेथे त्या परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाची कोणतीही इमेज आली नाही.
दरम्यान वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर यांच्याशी संपर्क साधला असता, रविवारी माकडांची काॅलींग होती; परंतु पगमार्क आणि ट्रॅप कॅमेऱ्यात इमेज आढळली नाही. वन विभागाने गस्त घातल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच गणेशपूरचे सरपंच मनीष गणवीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, चेतन गभणे, महेश भोंगाडे, नितीन बोरकर, चेतन बोरकर यांच्यासह कंझर्वेशन ऑफ अर्थचे सदस्य अझहर हुसैन शोएब अन्सारी आणि निहाल गणवीर, राऊंड ऑफिसर सय्यद, वनरक्षक श्रीराम या परिसरात गस्त घालीत आहेत.
नागरिकांनी सतर्क राहावे
वाघाचे दर्शन झाले नसले तरी नागरिकांनी सतर्क राहावे. एकटे फिरु नये. माॅर्निंग वाॅकला जाण्याचे टाळावे, तसेच वाघ दिसल्यास कुणीही चुकीचे पाऊल उचलू नये, असे आवाहन भंडाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी सांगितले. सध्या गणेशपूर आणि पिंडकेपार परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सर्वत्र वाघाचीच चर्चा आहे.