आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग : जिल्ह्यातील दोन शाळांची निवडभंडारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंट संस्कृतीच्या तोडीचे शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील दोन शाळांमधील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. सोमवारला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येथील विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे पत्र शिक्षण विभागाने दिले आहे. जिल्हा परिषद शाळांमधून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिल्या जात नाही. हा गैरसमज लाखनी तालुक्यात येणाऱ्या खराशी व तुमसर तालुक्यातील डोंगरला शाळेने दूर केला आहे. या दोन्ही शाळेमधून येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाला मागे टाकेल अश्या तोडीचे शिक्षण येथील शिक्षक देत आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये पाल्यांना टाकण्यासाठी पालकांची धडपड दिसून येते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती एका उंचीवर नेवून ठेवणाऱ्या या शाळांची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक मंत्री व अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला मात्र पहिल्यांदाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा विद्यार्थ्यांशी थेट मुख्यमंत्री संवाद साधून त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहेत.याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे. उद्या शाळेचा प्रवेशोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी खराशी व डोंगरला येथील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना यासाठी बोलविण्यात आले आहे. त्यात प्रत्येकी तीन विद्यार्थीनी व दोन विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे. यासोबतच प्रत्येकांचे पालक, शाळेतील शिक्षक, गटशिक्षणाधिकारी यांनाही यात सहभागी होण्याचे पत्र देण्यात आले आहे.अशा कार्यक्रमातून प्रथमच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी सोबत मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याने विद्यार्थ्यांची ही उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. (शहर प्रतिनिधी)
मुख्यमंत्री साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
By admin | Published: June 27, 2016 12:46 AM