मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : तुमसर व मोहाडी तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारा बावनथडी आंतरराज्य प्रकल्प यावर्षी केवळ ५०.७३ टक्के भरला असून, सदर धरणाची स्थिती ही मायनसमध्ये आहे. दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांची चिंता येथे वाढली आहे. उन्हाळ्यात या धरणातून बावनथडी नदीत शेतीसिंचन व पाणीपुरवठा योजनेकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. धरणातील पाणी पातळीत वाढ न झाल्यास उन्हाळ्यात भीषण जलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बावनथडी नदीवर तुमसर तालुक्यातील सितेकसा येथे आंतरराज्य धरण आहे. सध्या या धरणात ५०.७३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात या धरणात ७७.२५ टक्के पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात व मध्य प्रदेशात पाऊस न पडल्याने यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना व पाणीपुरवठा योजनेला या धरणातून पाणी विसर्ग करण्यात येतो. खरीप व रब्बी हंगामातही सदर धरणातून पाण्याच्या विसर्ग दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना होत असल्याने येथील शेती सुजलाम होते. बघेडा तलावात या धरणातून पाणी सोडण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाकरिता या तलावाच्या पाण्याचा लाभ होतो. परंतु, यासाठी पावसाची सरासरी गाठणे महत्वाचे आहे.
धरणाची क्षमता
या धरणाची एकूण क्षमता २८०.२४१ दलघमी इतकी असून, पूर्ण धरण भरल्यानंतर पाण्याची पातळी ३४४.४० इतकी होते. धरणाची सध्याची स्थिती : सध्या पाणी पातळी ३४१.०० मीटर असून, जिवंत पाणीसाठा १२९.१९ दलघमी आहे. सदर धरण पूर्ण भरण्याकरिता ३.४० मीटर पाणीसाठ्याची गरज आहे.
ऑगस्ट महिना संपण्यास अजून तीन दिवस शिल्लक आहेत. बावनथडी धरण सध्या मायनसमध्ये असून, सध्या तो ५० टक्के भरला आहे. त्यामुळे पुन्हा ५० टक्के हा धरण भरण्याची गरज आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत या प्रकल्पात पाण्याचा साठा होणे अत्यंत गरजेचे आहे. परिणामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार आहे.
बावनथडी धरणात सध्या ५०.७३ टक्के पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रातही पाऊस कमी पडला. लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी पडल्याने पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची गरज आहे.
- आर. आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसर