भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात रिक्त असलेल्या जागांवर अनुकंपा पदभरती अंतर्गत विलंब होत असल्याची बाब उघडकीला आल्यानंतर पदभरतीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी पूर्ण न झाल्याने अनुकंपाधारकांनी एल्गार पुकारत सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत १९८ अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास दीड दशकाचा कालावधी लोटूनही त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. राज्य शासनाच्या निर्णयानुसार सहा महिन्याचा कालावधी लोटून गेला असला तरी, जिल्हा परिषद प्रशासनाने अनुकंपा पदभरती प्रक्रिया सुरू केली नाही. अनुकंपा भरतीसाठी १९८ उमेदवार प्रतीक्षेत आहेत. १२ ते १३ वर्षांपासून ते या पदभरतीची वाट बघत आहेत. अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार निवेदने व चर्चा करण्यात आली. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाकडून अनुकंपाधारकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे समजते. शासकीय कर्मचारी नोकरीवर असताना मृत्यू पावल्यास त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडू नये म्हणून एका वारसाला अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्याविषयी शासन निर्णय निर्गमित आहेत. तसेच ५ फेब्रुवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार ४५ दिवसाच्या आत भरती प्रक्रिया राबवून शासनास माहिती सादर करणेसुद्धा बंधनकारक आहे. मात्र या निर्णयालाही केराची टोपली दाखविण्यात येत आहे. आचारसंहितेत अनुकंपा भरती प्रक्रिया करता येते, असे निवडणूक आयोगाचे पत्र आहे. अनुकंपा पदभरती प्रक्रिया बंद ठेवून निवडणूक आयोगाला मार्गदर्शन मागवीत असल्याची अशी बाब अनुकंपाधारकांना सांगून आश्वासित करण्यात आले होते. परंतु ती बाबही पूर्ण करण्यात आली नाही. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून याबाबतचे मार्गदर्शनही मागविण्यात आले नसल्याचे अनुकंपाधारकांचे म्हणने आहे. याशिवाय २ ऑक्टोबर २०२० पासून अनुकंपा प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या नोटीस फलकावर लावण्यात येईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र अजूनपर्यंत अनुकंपा यादी प्रकाशित करण्यात आली नाही. २ ऑक्टोबर २०२० पासून अनुकंपा प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या नोटीस फलकावर लावण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र अजूनपर्यंत अनुकंपा यादी प्रकाशित करण्यात आली नाही.
महाराष्ट्रातील २० ते २५ जिल्हा परिषदांतर्गत भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. परंतु भंडारा जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया अजूनही रखडली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आठ दिवसांपूवी देण्यात आले होते. तसेच या उमेदवारांनी १८ जानेवारीपासून सीईओ यांच्या कक्षासमोरच धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार या उमेदवारांनी १८ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात अनुकंपाधारक मंगेश माकडे, चेतन सेलोकर, विद्याधर डुंबरे, सचिन भोयर, महेश मस्के, उमेश डोंगरवार, राजकुमार टेकाम, जितेंद्र कांबळे, दिलीप नागरीकर, संदीप बावनकुळे, ज्ञानेश्वर कडव, चेतन काळे, धीरजकुमार रामटेके, अभिलाष आकरे आदींचा सहभाग आहे.
बॉक्स
आंदोलनाचा इशारा
तसेच या उमेदवारांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे, या धरणे आंदोलनात सर्व अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे