विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निवेदन : नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांचेही जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्र्यांना साकडेभंडारा : भंडारावासीयांना गेले दोन वर्षापासून नागनदीचे मलमुत्रयुक्त दूषित पाणी प्यावे लागत आहे. परंतु अनेक अर्ज विनंत्या व निवेदने देवूनही प्रशासन शांत आहे. शहराचे व वैनगंगा नदी परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाग नदीचा प्रवाह बदलवून भंडारावासीयांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना करण्यात आली. सदर मागणी नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांच्यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. मोठ्या प्रमाणात इकार्निया वनस्पतीचे आच्छादन पसरले आहे. याबाबत विदर्भ राज्य आंदोलन समिती पुढे सरसावली असून आज जलसंपदा मंत्री गिरीश महाज यांना याबाबत निवेदन सादर करून जनतेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी करीत समितीने माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष अॅड.पद्माकर टेंभुर्णीकर यांचे नेतृत्वात ६४ पानांचे निवेदन सादर केले. यावेळी मंत्री महोदयांनी या प्रश्नांची गंभीर दखल घेवून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच विभागाच्या सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भंडारेकरांना शुद्ध पाण्यासाठी किमान दोन वर्षे वाट पाहावी लागणार. या वक्तव्यावर माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी आक्षेप घेत जनतेच्या सहनशिलतेचा शासनाने अंत पाहू नये, असे सांगून प्रशासन हे जनतेसाठी आहे की त्यांच्या विरुद्ध आहे असा सवाल उपस्थित केला. माजी आमदार मधुकर कुकडे यांनी सुद्धा पिण्याच्या पाण्याइतका गंभीर प्रश्न दुसरा असूच शकत नाही असे सांगून हा प्रश्न ताबडतोब सोडविणे गरजेचे आहे अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष अॅड.पद्माकर टेंभुर्णीकर यांनी सामान्य जनतेला शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार नाही काय? असा प्रश्न करून शासनाने युद्ध पातळीवर या कामास प्राधान्य देवून हा प्रश्न संबंधित विभागांच्या समन्वयातून सोडवावा अशी मागणी केली. मंत्रीमहोदयांनी या सर्व प्रश्नांची गंभीरपणे दखल घेतली आणि ताबडतोब कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी महासचिव रमाकांत पशिने, युवा अध्यक्ष तुषार हटेवार, शहर अध्यक्ष प्रमोद मानापुरे, मिडीया अध्यक्ष सारंग तिडके, युवा उपसचिव मयूर निंबार्ते, वासुदेवराव नेवारे, अविनाश पनके, गणेश धांडे, अर्जून सूर्यवंशी, केशव हुड, दामोदर क्षीरसागर, विजय दुबे, अरविंद ढोमणे, भारत चौधरी, शुभम भिवगडे, देवदास गभणे तसेच बरेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भंडारा : नागनदीचे पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात मिसळून नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांनी राज्याचे जलसंपदा व खारभूमी मंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा पाणी पुरवठ्याचे मुख्यस्त्रोत वैनगंगा नदी असून जलशुद्धीकरण केंद्र सुद्धा आहे. वैनगंगा नदीवर गोसे येथे गोसीखुर्द बंधारा बांधण्यात आलेला असून या बंधाऱ्यामध्ये सन २०१३ पासून पाणी साठविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. यामुळे नदीच्या पात्रामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतीची उत्त्पत्ती होत असून नदीच्या पात्रातील पाणी हे दूषित होत असल्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथून वाहणारी नागनदीद्वारे शहरातील निघणारे गटारीचे पाणी पुढे जावून वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये मिळसळ असते. यामुळे सुद्धा वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती वाढत आहे. त्यामुळे सुद्धा दूषित पाणी होत असल्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे. या बाबीमुळे नदी काठावरील वास्तव्य करणाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याबद्दल नागरिक मत व्यक्त करीत आहे. शासन निर्णयानुसार नैसर्गिक स्त्रोत शासनाने आपल्या अधिनस्त केल्यामुळे वैनगंगा नदी सुद्धा ही शासनाच्या अधिनस्त आलेली आहे. वैनगंगा नदीच्या पात्रातून पाणी उचल करण्याबाबत लघुपाटबंधारे विभागाकडून प्राप्त होणाऱ्या देयकापोटी भंडारा नगरपरिषदेने माहे मार्च २०१६ मध्ये रु. ४०.०० लक्षचा भरणा केलेला आहे. नागनदीद्वारे प्रवाहित होणाऱ्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून शुद्ध पाणी नदीच्या पत्रात सोडण्यात यावे, तसेच नदीच्या पात्रात असलेली वनस्पतीची साफसफाई लघुपाटबंधारे विभागामार्फत तातडीने करण्याबाबतचे निर्देश आपल्या स्तरावर देण्याबाबतची कारवाई करावी अशी मागणी नगराध्यक्ष बागडे यांनी निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)
वैनगंगेच्या दूषित पाण्याची जलसंपदा मंत्र्यांकडे तक्रार
By admin | Published: May 31, 2016 12:43 AM