१०८ कामे प्रगतिपथावर : टंचाईग्रस्त ५७ गावांना मिळाला दिलासाभंडारा : जिल्ह्यात २६३ गावामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून टंचाई निवारणार्थ ४१६ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. त्यापैकी ५७ गावातील १४१ कामे पूर्ण झाली असून या गावांना पाणी टंचाईच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २६३ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने वर्तविली होती. त्यानुसार प्रशासनाकडून संबंधित ग्रामपंचायतीकडून तत्काळ उपाययोजनांची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार ४१६ उपाययोजना प्रस्तावित करुन तातडीच्या २५५ कामांना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी तत्काळ मंजुरी दिली. यामध्ये १४८ नवीन विंधन विहीरी, ३१ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १५७ विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, ८० विहिरीतील गाळ काढणे असे ४१६ कामे प्रस्तावित होते. त्यापैकी विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीच्या १५७ कामांना तात्काळ मंजुरी देवून त्यापैकी १२४ कामे पूर्ण झाली आहेत.१४८ विंधन विहीरीपैकी ८५ कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी १७ कामे पूर्ण झाली आहेत.शिवाय ४९ विंधन विहीरी इतर योजनामधून मंजूर केल्या असून त्यापैकी ४० कामे पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती पैकी १४ कामे पूर्ण झाली आहेत. यातून टंचाईग्रस्त ५७ गावांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित ८१ गावातील १०८ उपाययोजनांची कामे प्रगतीपथावर असून येत्या आठवडयात ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.जिल्ह्यात ६०५७ हातपंप कार्यरत आहेत. याशिवाय ९२ विंधन विहिरीवर आधारीत विद्युत पंपावर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हातपंप, विद्युत पंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा परिषद मध्ये उपअभियंता यांचे कार्यालय आहे. तसेच पंचायत समिती स्तरावर खंड विकास अधिकारी यांच्या अधिनस्त ट्रायसेम यांत्रिकी हातपंप कर्मचाऱ्यांचे दुरुस्तीपथक आहे. (नगर प्रतिनिधी)
पाणीटंचाई निवारणार्थ १४१ कामे पूर्ण
By admin | Published: May 05, 2016 12:54 AM