भंडारा : काळानुरूप बदल होणे कधीही अपेक्षित आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. असाच एक निर्णय देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी घेतला. देशात संगणक क्रांतीच्या मुहूर्तमेढीमुळे आधुनिकतेची कास भारताने धरली. याचाच परिणाम आज प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले.
साकोली येथे जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या शाखेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक कापगते, साकोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज कापगते, माजी जिल्हाधिकारी किशोर गजभिये, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मोहन पडोळे, प्रभाकर कळंबे, वैद्य, येळणे, पुरोगामी संघटनेचे लालबहादूर काळबांधे, वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष अशपाख खान, माजी संचालक नंदू रामटेके, शिक्षक नेते बी.टी. पांगूळ, श्रावण लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. अभिजित वंजारी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले, तसेच सभासदांकरिता गृहकर्ज योजना राबवावी असे सुचविले. आ. नाना पटोले पुढे म्हणाले, जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांचे हित जोपासणारी सोसायटी आहे. साकोलीत या इमारतीचे लोकार्पण करून शहराच्या वैभवामध्ये भर पडली आहे.
तसेच राष्ट्रीयीकृत बँकेसोबत पतसंस्थेच्या कारभार व प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. उल्लेखनीय म्हणजे प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे यांनी गत पाच वर्षांत सभासदांच्या हितार्थ राबविण्यात आलेल्या योजनांची व निर्णयांची माहिती दिली. यात सभासद कर्ज, व्याजदर टप्प्याटप्प्याने १२ टक्क्यांहून ९ टक्क्यांपर्यंत आणणे, सभासदाचा मृत्यू झाल्यास मृत्यूफंड कर्जमाफ मर्यादा ६ लक्ष वरून १४ लक्ष रुपये, कर्ज निरंक असणाऱ्या मृत सभासदांच्या वारसांना ५० हजार रुपये, डीसीपीएसधारक सभासदांचा मृत्यू झाल्यास २ लक्ष रुपये आर्थिक आधार देण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.
संचालन दिलीप ब्राह्मणकर यांनी केले. आभार देवराम थाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, शाखाध्यक्ष एम.पी. वाघाये, किशोर ईश्वरकर, पी.आर. पारधी, गणेश साळुंखे, नामदेव गभणे, दिनेश घोडीचोर, विलास टिचकुले, विजयकुमार डोये, नूतन बांगरे, शैलेश बैस, अविनाश शहारे, विनोद राठोड, दिलीप बावनकर, दीक्षा फुलझेले, संध्या गिऱ्हेपुंजे, दुर्गादास भड, प्रधान व्यवस्थापक विलास फटे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
‘त्या’ कल्याण निधीची मर्यादा २० हजार रुपये
संस्थेतर्फे विविध योजना राबविण्यात येतातच. याशिवाय एखादा सभासद मृत पावल्यास त्याचवेळी अंत्यविधीकरिता किंवा सेवानिवृत्तीच्या वेळेस दिला जाणारा कल्याण निधी मर्यादा १० हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यात आल्याचीही माहिती या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देण्यात आली. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध आर्थिक सोयी व सेवानिवृत्त सभासदांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने त्यांच्या ठेवी स्वीकारण्याकरिता शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी निवृत्त जिल्हाधिकारी गजभिये यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख पाहून गौरवोद्गार काढले.