गुणरत्न बोरकर : वाणिज्य अभ्यास मंडळाचा कार्यक्रमभंडारा : माणसाचे मन हे नेहमी विचलित होणारे असते. ज्याप्रमाणे माकड हे एका ठिकाणी वास्तव्य करू शकत नाही त्याचप्रमाणे मानवाचे मन हे विचलित स्वरूपाचे असते. जीवनात यश संपादन करण्यासाठी सुरवातीला आपण ध्येय ठरविणे आवश्यक आहे एकदा ध्येय निश्चित झाले कि, ध्येय प्राप्तीसाठी त्यानुसार मनाची एकाग्रता ठेवून जर सतत प्रयत्न केले तर त्यातूनच आपल्याला यश संपादन करता येते. प्रत्येक व्यक्ती मध्ये एक विशेष स्वरूपाचा गुण असतो. तो गुण ओळखुन त्यातूनही आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. पण त्यासाठी हि मनाची एकाग्रता आवश्यक असते, असे प्रतिपादन गुणरत्न बोरकर यांनी केले.जे.एम.पटेल महाविद्यालयात वाणिज्य विभाग व वाणिज्य अभ्यास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मनाची एकाग्रता या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. यावेळी डॉ.ढोमणे म्हणाले, ज्याप्रमाणे गौतम बुद्धाने आपल्या मनावर ताबा ठेवून जीवनात महान असे यश संपादन करून नावलौकिक केले त्याचप्रमाणे आपणहीमनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. प्रत्येक आई वडिलांची ईच्छा असते की, आपल्या मुलांनी मोठे पद मिळविले पाहिजे. त्यातून नावलौकिक केले पाहिजे. जीवनात हिऱ्यासारखे चमकण्यासाठी कठोर परिश्रम गरजेचे आहे. त्या परिश्रमातून जीवनात यश संपादन करता येते. यावेळी वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख डॉ.राहुल मानकर म्हणाले, दरवर्षी वाणिज्य विभाग व वाणिज्य अभ्यास मंडळांमार्फत अनेकविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थांचा सर्वांगीण विकास घडून यावा, त्यांच्या गुणात, कौशल्यात वृध्दी व्हावी यासाठी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा विकास साधला जातो. आपला विद्यार्थी कोणताही पातळीवर कमी पडू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.वाणिज्य विभागाचे प्रा.शैलेश वसाणी म्हणाले, मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी सकाळी व्यायाम करणे, व्यसनाधीन असणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यावशक आहे. आपण केलेले कार्य मनातून केले तरच मनाची एकाग्रता वाढविता येते. यासोबतच विद्यार्थांनी अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले संचालन प्रा.प्रशांत वाल्देव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.माधवी मंदुरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील प्रा.आनंद मुळे, प्रा.धनराज घुबडे, प्रा. प्रशांत गायधने, प्रा.नंदिनी मेंढे, प्रा.सोनु शर्मा, प्रा.भाग्यश्री शेंडे, तसेच मनोहर पोटफोडे, विनोद नक्शुलवार तसेच रॉबिन सोनटक्के, दिनेश बोकडे, हेमंत सोनकुसरे, गगन बिसेन आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
यशासाठी मनाची एकाग्रता अत्यावश्यक
By admin | Published: March 05, 2017 12:33 AM