१२२ विद्यार्थ्यांना मिळाले जात प्रमाणपत्र : महसूल विभागाचा अभिनव उपक्रमभंडारा : शिक्षणासह नोकरीकरिता सर्वांना जात प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना तहसील कार्यालयात पायपीट करावी लागते. ही बाब लक्षात घेवून महसूल विभागाने अभिनव उपक्रमातून जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा खराशी येथील १२२ विद्यार्थ्यांना शाळेतच जात प्रमाणपत्राचे वाटप केले. यामुळे त्यांच्या पालकासमोर असलेली भविष्याची चिंता यातून मिटली.लाखनी तालुक्यातील खराशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळासिध्दी उपक्रमात राज्यात अग्रमानांकित ठरली आहे. या शाळेचा आदर्श राज्यातील अन्य शाळांनी घ्यावा असा अध्यादेश काढून शाळेतील उपक्रमांची महती समोर आणली आहे. अशा या उपक्रमशिल शाळेतील इयत्ता १ ते ४ च्या १२२ विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र शाळेतच देण्याचा उपक्रम लाखनी तहसील कार्यालयाने राबविला.साकोली उपविभागांतर्गत येणा-या लाखनी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शाळेत प्रत्यक्ष येवून मुख्याध्यापकांशी संवाद साधून प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत सांगितले. शाळा स्तरावर तहसीलदार शक्करवार हे स्वत: उपस्थित राहिले. जात प्रमाणपत्र देण्यासाठी येणा-या अडचणी यामाध्यमातून सोडविण्यात आल्या. शाळेतच सेतू केंद्राची तात्पुरती उभारणी करुन १२२ ही विद्यार्थ्यांना त्यांचे जाती विषयक प्रमाणपत्र तयार करुन शाळेतच वितरित केले. या अभिनय उपक्रमात नायब तहसीलदार अश्विनी जाधव, मंडळ अधिकारी टिकेश्वर गि-हेपुंजे, तलाठी तुषार हटनागर, सेतू संचालक अशोक खंडाईत यांचे सहकार्य लाभले. यावेळी मुख्याध्यापक मुबारक सैय्यद, शिक्षक जयंत खंडाईत, राम चाचेरे, सतीश चिंधालोरे, दुर्गा टेकाम यांनी सहकार्य केले. यावेळी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन व आभार मुख्याध्यापक मुबारक सैय्यद यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
चिमुकल्यांच्या भावी आयुष्याची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 12:25 AM