वाकेश्वर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीचा बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाचा होत असलेला उद्रेक व लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यी, पालक व शिक्षक संभ्रमीत ढाले आहेत. बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक, समीक्षक / नियामकांचे पत्र, परीक्षेसाठी आवश्यक असणारे सर्व दस्ताऐवज, सर्व शाळांना जवळपास प्राप्त झाले होते, परंतु सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आता शिक्षण आणि परीक्षेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पालक वर्ग शिक्षकांना खरंच अजूनही परीक्षा होईल की नाही, अशी भीती वाटत आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक शाळा व महाविद्यालयातून ऑनलाइन शिक्षण सुरू केले गेले. त्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांकडे अँड्राइड मोबाइल नाहीत, तर ज्यांच्याकडे मोबाइल आहेत, तेथे रेंज नसल्यामुळे अडचणी वाढत गेल्या होत्या. अशा बिकट अवस्थेतून विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षा देणार आहेत.
बॉक्स
दहावी बारावीची परीक्षा होईपर्यंत पालकांत संभ्रम कायम
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे. बारावीच्या मोजक्यात विषयांची परीक्षा घेऊन इतर विषयांचे मूल्यांकन महाविद्यालयीन स्तरावर करा, असा प्रस्ताव कनिष्ठ महाविद्यालय महासंघाने शिक्षणमंत्र्याकडे मांडला, अशी माहिती आहे. त्यातच १२वीची परीक्षा मे अखेर तर १०वीची परीक्षा जूनमध्ये होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध, तसेच शनिवार, रविवारला लॉकडाऊन होता. सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सामना करण्याची मानसिक तयारी विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे झाले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढत चालली आहे. २३ नोव्हेंबर २०२० पासून शाळा सुरू करण्यात आल्या व मिळेल त्या वेळात शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काही शाळांनी सराव परीक्षाही घेतल्या आहेत, पण तरीही विद्यार्थ्यांना लेखन, सराव, प्रात्यक्षिकाला आवश्यक असणारा वेळही मिळू शकला नाही. शिक्षण मंडळाच्या वतीने बोर्डाच्या परीक्षेत कसे प्रश्न येतील, याबाबत प्रश्नसंच विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. दहावी-बारावीचा २५ टक्के अभ्यास क्रम कमी झाला आहे. हे जरी सत्य असले, तरी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणाऱ्या या बोर्डाच्या परीक्षेत कोरोना महामारीने व त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये अनेक अडचणी व संभ्रमाची अवस्था निर्माण होत आहे.
कोट
बारावीचा वर्ग हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पाइंट आहे. त्या दृष्टीने मी तयारी करीत आहे. एकीकडे वाढता कोरोनाचा संसर्ग तर दुसरीकडे परीक्षा पुढे ढकलल्याने काळजी वाटत आहे. या वर्षी १२वीचा नवीन अभ्यासक्रम असूनही शाळेने तो पूर्ण करून आमची सराव परीक्षा घेतली आहे, तरी मनात परीक्षेची भीती आहेच.
- ईशा घोडेस्वार, परीक्षार्थी,
गांधी कनिष्ठ महाविद्यालय, पहेला.