शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाकरिता अंदाजे तीन कोटी रुपये मंजूर आहेत. ३ कोटी १८ लक्ष २० हजार ६४४ रुपये किमतीची कामे प्रस्तावित करण्यात आलेली होती, परंतु निविदा काढताना फक्त २ कोटी २३ लक्ष रुपये किमतीची निविदा काढून स्वतःच्या लाभासाठी घोळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात लहान-मोठी कामे एकत्रित (क्लब)करुन ९८ लक्ष रुपये व १ कोटी २५ लक्ष रुपये किमतीच्या दोन वेगवेगळ्या निविदा काढण्याचे कारण काय ? संपूर्ण कामे एकत्रित करुन एकच निविदा का काढण्यात आली नाही? अंदाजपत्रकीय एक नुसार रक्कम एक कोटी ३ लक्ष १७ हजार ५३७ रुपये आहे, परंतु निविदा ९८ हजार रुपयांचीच आहे. तसेच अंदाजपत्रकीय दोन नुसार रक्कम एक कोटी ३२ लक्ष ९७ हजार ३६७ रुपये आहे, परंतु निविदा एक कोटी २५ लक्ष रुपयांचीच काढण्यात आली, यात सुद्धा घोळ करण्यात आलेला आहे. निविदा काढताना वस्तू व सेवा कराची रक्कम निविदेत समाविष्ट न करता ई निविदा काढण्यात आली. निविदेची जाहिरात कोणत्या वर्तमानपत्रात देण्यात आली हे कळायला मार्गच नाही. ही निविदा कोणालाही दिसली नसल्याने जाहिरात देण्यात आली की नाही हे गुलदस्त्यात असून मर्जीतील व्यक्तीला कंत्राट देण्यासाठी तर हा खटाटोप करण्यात आला नाही ना, असा संशय आहे.
निविदा काढताना करण्यात आलेला घोळ प्रकरणाचे स्पष्टीकरण तीन दिवसात देण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस मोहाडी शहराच्या वतीने नगर पंचायत कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे शहराध्यक्ष पुरुषोत्तम पात्रे, माजी उपसभापती खुशाल कोसरे, युवा नेते रफिक सैय्यद यांनी दिला आहे.
कोट
शासन नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आयकर, जीएसटी व इतर कर मिळून तीन कोटी ९९ लक्ष रुपये होतात व तेवढीच राशी मंजूर आहे. यात कोणताच घोळ नाही. तक्रारकर्त्यांनी इस्टिमेट बघून घ्यावे.
रामेश्वर पांडागळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, मोहाडी