भंडारा : भंडाराजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली असून कॉंग्रेसने भाजपच्या फुटीर गटाशी हातमिळवणी करत भंडारा जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज केली आहे. अध्यक्षपद कॉंग्रेसकडे तर उपाध्यक्षपद हे भाजपकडे गेलं आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत कुण्या एका पक्षाला बहुमत नसल्याने गत तीन महिन्यांपासून कुणाची सत्ता येणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून, भाजप-काँग्रेसने एकत्र येत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रसचे गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी विकास फाउंडेशनचे (भाजपचा फुटीर गट) संदीप टाले हे विजयी झाले आहेत.
सर्वाधिक जागा मिळवून मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होईल, असे सुरुवातीला बोलले जात होते. परंतु पंचायत समितीत सभापती निवडीने सर्व गणित बिघडविले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला. अशा स्थितीत आता भाजप पुढे आला. मात्र भाजपमध्येही दुफळी निर्माण झाली. विकास फाऊंडेशनचा गट वेगळा झाला. तर, आता काँग्रेस व भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या या युतीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.