लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पंचायत समिती सभापती निवडीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला असून, याचा परिणाम जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी भाजपच्या हाती गेली आहे. भाजप कुणाला मदत करणार यावर अध्यक्षपदाचे गणित अवलंबून आहे. मात्र, भाजपमध्येही दोन गट पडल्याचे दिसत आहे. आता जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार याची चर्चा जिल्ह्यात रंगत असून, नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड येत्या १० मे रोजी होत आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच शुक्रवारी झालेल्या सभापती निवडीने जिल्हा परिषदेचे सत्ता समीकरण बदलायला सुरुवात झाली आहे. सभापती निवडीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसून आले. पवनी पंचायत समितीत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीने शिवसेना, भाजप आणि बसपासोबत हातमिळवणी केली. तुमसरमध्ये राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी भाजपने केली. भंडारा पंचायत समितीतही राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले. मोहाडीतही अशीच स्थिती राहिली. परिणामी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला. अशा स्थितीत आता भाजपच्या हाती सत्तेची चावी गेली आहे. मात्र, भाजपमध्येही दोन गट पडले असून, भाजपचे पाच आणि एक अपक्ष, असे सहा सदस्य थंड हवेच्या ठिकाणी रवाना झाले.
कुणाची सत्ता येणार
- महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते; परंतु पंचायत समिती सभापती निवडीनंतर आता एकत्र येणे शक्य दिसत नाही. काँग्रेसकडे २१ सदस्य असून, त्यांना बहुमतासाठी सहा सदस्यांची गरज आहे. भाजपचा एक गट सोबत आल्यास काँग्रेस सत्ता सहज स्थापन करू शकतो. मात्र, दुसरीकडे भाजपनेही आपले सदस्य मध्यप्रदेशातील थंड हवेच्या ठिकाणी रवाना केले असून, सत्ता स्थापनेसाठी त्यांच्याही हालचाली सुरू आहेत. अशा स्थितीत नेत्यांचे मात्र मौन असून, नेते कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा हा गृह जिल्हा आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागाही मिळाल्या आहे. अशा स्थितीत नाना पटोले कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काय वेळेवर खेळी खेळणार याकडेही जाणकारांचे लक्ष लागून आहे. नेत्यांची भूमिका काय राहणार आणि कोण सत्तेत येणार याची उत्सुकता लागली आहे.