टमाटर रस्त्यावर फेकून केला निषेध : १३० कार्यकर्त्यांना अटक, पोलिसांचा बळाचा वापरभंडारा : केंद्र सरकारने चलनातून अचानक ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्या. त्यामुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने भाजीपालाधार्जनीचे उत्पादन कवडीमोल भावात विकावे लागत आहे. यात काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आज भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून महामार्ग मोकळा केला. दरम्यान पोलिसांनी काँग्रेसच्या १३० कार्यकर्त्यांना अटकेची कारवाई केली.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तैसर अहमद, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण यांच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, जि.प. सभापती नीळकंठ टेकाम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सिमा भुरे, प्रमोद तितीरमारे, धनराज साठवणे यांच्या मार्गदर्शनात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेण्यात आला. नोटबंदीमुळे देशातील जनतेला झळ सोसावी लागत आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वसामान्यांविरोधातील या निर्णयाच्या निषेधार्थ भंडारा येथे काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने टमाटर सह अन्य पालेभाज्या कवडीमोल भावाने नाईलाजाने विकावे लागत आहे. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर टमाटर फेकून केंद्र व राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबली. अचानकपणे घेतलेल्या या पवित्र्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांगा लागल्या. वाहतूक रोखून धरत काँग्रेसने घोषणाबाजी सुरू करताच भंडारा शहरचे ठाणेदार जयवंत चव्हाण यांनी पोलीस बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना सुरूवातीला असे न करण्याचे सुचविले. मात्र, ठाणेदारांचे न एैकता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाणेदारांच्या सुचनेनुसार पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करून ताब्यात घेतले. यात १३० कार्यकर्त्यांना अटक करून सायंकाळी सोडण्यात आले. पोलिसांच्या पवित्र्याने वाहतूक काही काळासाठी थांबलेली वाहतूक पूर्ववत सुरू झाली. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, नीळकंठ कायते, प्रेम वनवे, भूषण टेंभुर्णे, शुभम साठवणे, नगरसेवक जयश्री बोरकर, मुकुंद साखरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)मोर्चेकऱ्यांवर नामुष्की काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. यात काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. पहिल्या वाहनात कोंबून सर्व नेत्यांना अटक करून सुरूक्षित ठिकाणी नेण्यात आले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची जबाबदारी महेंद्र निंबार्ते व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सिमा भुरे यांनी स्वत:कडे घेतली. दरम्यान पोलिसांनी दुसरे वाहन आल्यानंतर निंबार्ते व सिमा भुरे यांना अटक केली. यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे कुणी नसल्यामुळे उर्वरीत आंदोलकांनी मोर्चा स्थळावरून काढता पाय घेतला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन न देताच आंदोलन संपवावे लागण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवल्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा.
नोटबंदी विरोधात काँग्रेसने रोखला महामार्ग
By admin | Published: January 08, 2017 12:24 AM